महिलेचा मोबाइल हिसकावणारा चोरटा गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – शहरात लुटमारीच्या घटना वाढल्या असून, प्रभात रस्ता परिसरात पादचारी महिलेचा मोबाइल हिसकावून पसार झालेल्या चोरट्याला गुन्हे शाखेच्या युनिटक एकने सापळा रचून अटक केली. महंमद फिरोज खान (वय 24,रा. विष्णुकृपानगर, शिवाजीनगर रेल्वे स्थानकाजवळ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

शहरातील वाढत्या गुन्ह्यांना पायबंद घालण्यासाठी पोलिसांकडून गस्त वाढविण्यात आली आहे. दरम्यान, वीस दिवसांपूर्वी खानने प्रभात रस्त्यावरून रात्री जात असलेल्या महिलेचा मोबाइल हिसकावून नेला होता. याबाबत महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेच्या युनिट एककडून करण्यात येत होता. मोबाइल चोरटा शिवाजीनगर भागातील महात्मा गांधी वसाहत थांबल्याची माहिती पोलीस हवालदार योगेश जगताप यांना मिळाली. त्यानंतर पोलीस निरीक्षक अरुण वायकर, श्रीकांंत वाघवले, तुषार खडके, इरफान मोमीन, बाबा चव्हाण यांच्या पथकाने त्याला पकडले. त्याच्याकडून चोरीस गेलेला मोबाईल जप्त केला आहे. त्याच्याकडे चौकशी सुरू असून, त्याने आणखी काही गुन्हे केले आहेत का, याबाबत पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

फेसबुक पेज लाईक करा –