चोरीच्या पैशातून मैत्रिणीला 5 स्टारमध्ये ‘जेवण’ अन् दोस्तांना ‘ड्रिंक’, पुण्याच्या गुन्हे शाखेकडून बहाद्दराला अटक

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन – कोरेगाव पार्कमधील एका रुग्णालयातून 27 हजाराची रोकड चोरून पसार झालेल्या कामगाराला गुन्हे शाखेने पकडले. त्याने चोरीच्या पैशांमधून मैत्रिणीला पंचतारांकित हॉटेलात जेवण अन मित्रांना दारूची पार्टी दिली आहे. तर, खडकीत जबरदस्तीने मोबाईल चोरणार्‍यासही अटक करण्यात यश आले आहे.

रोहित मधुकर ढगळे (रा. आळंदी) व धीरज शंकर कटीकर (रा. जनवाडी ) अशी जेरबंद केलेल्यांची नावे आहेत.

शहरात लुटमारीच्या घटना वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून गस्त घातली जात आहे. तसेच, चोरट्यांची माहिती काढण्यात येत आहे. दरम्यान, युनिट दोनचे पथक माहिती घेत होते. कोरेगाव पार्क येथील सॉल्ट केव हॉस्पिटलमधील गल्ल्यातील 27 हजारांची रोकड चोरी करणारा कामगाराला अटक केली आहे. चोरीकरून पसार झाल्यानंतर त्याचा शोध घेण्यात येत होता. त्यावेळी तो ससून रस्त्यावरील पीएमपीएल बसस्थानकावर उभा असल्याची मिळाली. त्यानुसार रोहितला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने चोरीची कबुली देत 7 हजार रुपये पोलिसांकडे दिले. उर्वरित 20 हजारांची रक्कम त्याने मैत्रिणीला मोठ्या हॉटेलमध्ये दोनदा जेवण करण्यासाठी आणि मित्राला दारु पार्टी देण्यासाठी खर्च झाल्याचे सांगितले.

तसेच, खडकी पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरी करणारा धीरज हा येथील कुसाळकर चौकात आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला पकडले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने मोबाईल जबरदस्तीने चोरून नेल्याची कबूली दिली. त्यानुसार त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर यापुर्वी त्याच्याविरुद्ध जाळपोळ आणि मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत.

पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक जयवंत जाधव, पोलीस उपनिरीक्षक प्रताप शेळके, संजय दळवी, यशवंत आंब्रे, अनिल उसुलकर, चेतन गोरे, स्वप्निल कांबळे, विशाल भिलारे, अजित फरांदे, कादीर शेख यांच्या पथकाने केली.