Pune : गुन्हे शाखेकडून मोन्या विकारे टोळीतील तिघांना अटक, 2 पिस्तुलांसह काडतुसे जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या मोन्या विकारे टोळीतील तिघांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून 2 पिस्तुल, काडतुसे व घातक शस्त्र जप्त करण्यात आले आहेत. जांभुळवाडी दरी पुलाजवळ ही कारवाई केली आहे. तर त्यांचे साथीदार पसार झाले आहेत.

संकेत उर्फ मोन्या संतोष विकारे (वय 26), अमर नंदकुमार चव्हाण (वय 28) व अक्षय रवींद्र कांबळे (वय 24, सर्व रा. अप्पर बिबवेवाडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत गुन्हे शाखेचे कर्मचारी सुशील जाधव यांनी फिर्याद दिली आहे.

शहरात लुटमरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या घटना रोखण्याचे आवाहन पोलिसांसमोर आहे. गुन्हे शाखेच्या पथकांना सर्व सूचना देण्यात आल्या आहेत. यावेळी गुन्हे शाखेचे युनिट एकचे पथक माहिती घेत होते. यावेळी जांभूळवाडी दरी पुलाच्याजवळील महामार्ग रस्त्यालगत काहीजण दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे माहिती कर्मचारी सचिन जाधव यांना समजले. यानुसार सहाय्यक आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक ताकवले, उपनिरीक्षक संजय गायकवाड, कर्मचारी सचिन जाधव, इम्रान शेख, संजय बरकडे, अमोल पवार, तुषार माळवदकर यांच्या पथकाने याठिकाणी छापा टाकत तिघांना पकडण्यात आले. मात्र त्यांचे साथीदार पसार झाले आहेत. तिघांकडून दोन पिस्तूल, 2 काडतुसे व तसेच घातक हत्यारे जप्त करण्यात आले आहेत. चौकशी केली असता त्यांच्याकडून ते या रस्त्यावरील पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे दिसून आले. शनिवारी ही कारवाई करण्यात आली आहे.

मोन्या विकारे हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरीचे गुन्हे यासह गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो कोरोनाच्या गुन्ह्यात नुकताच कारागृहातून बाहेर आला आहे. त्यानंतर देखील त्याने गुन्हे करण्यास सुरुवात केली आहे. तर अमर चव्हाण याच्यावर देखील खून, खुनाचा यासह इतर गुन्हे दाखल आहेत. तर अक्षय कांबळे याच्यावर बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून, तो या गुन्ह्यात फरार होता.