Pune : शहरात चालू असणार्‍या ऑनलाइन ‘सेक्स’ रॅकेटचा गुन्हे शाखेकडून पर्दाफाश, चौघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात सुरू असणाऱ्या ऑनलाइन वेश्या व्यवसायाचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. चौघांना पकडत 2 मुलींची सुटका करण्यात आली आहे.

पवित्रकुमार नागेश्वर महतो, दिलीपकुमार उर्फ करण परमेश्वर महतो, सचिनकुमार वासुदेव मंडल व अनिलकुमार मेकलाल मंडल (रा. वाकड, मूळ. झारखंड) अशी पकडण्यात आलेल्याची नावे आहेत. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरात सुरू असणाऱ्या अवैध धंदे बंद करण्याच्या सूचना नवनियुक्त पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिल्या आहेत. यानुसार स्थानिक पोलीस व गुन्हे शाखा कारवाई करत आहे. दरम्यान उपनिरीक्षक श्रीधर खडके व पोलीस कर्मचारी संतोष भांडवलकर यांना माहिती मिळाली की शहरात एका संकेतस्थळाच्या माध्यमातून ऑनलाइन वेश्या व्यवसाय सुरू आहे. यानुसार याची माहिती काढण्यात आली. बनावट ग्राहक संपर्क साधत त्यांना रामवाडी नोवोटेल हॉटेलच्या गेटवर मुलीला पाठविण्यास सांगितले. मुलगी येताच तिला सामाजिक सुरक्षा विभागाने पकडले. तिच्याकडे चौकशी केली असता तिने माहिती दिली. यानुसार या आरोपींना पकडत त्यांच्या ताब्यातून आणखी एका मुलीची सुटका करण्यात आली. तर आरोपींना ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी येरवडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. मुलींना सुधारगृहात पाठविले आहे.

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त बच्चन सिंह, वरिष्ठ निरीक्षक वैशाली चांदगुडे, उपनिरीक्षक खडके, कर्मचारी कुमावत, माने, पठाण, महिला कर्मचारी मोहिते, पुकाळे, शिंदे, चव्हाण, भांडवलकर यांच्या पथकाने केली आहे.

You might also like