पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Crime Branch News | सहकारनगरमधून अवैध दारुची वाहतूक करणार्या टेम्पोसह चालकाला ताब्यात घेऊन पोलिसांनी ८ लाख ३३ हजार २०० रुपयांची दारु जप्त केली आहे.
सुरेश लक्ष्मी नारायण प्रजापती (वय २५, रा. उरुळी कांचन ता. हवेली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी अवैध धंदे समुळ नष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ कडील अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी अधिकारी व अंमलदार यांचे स्वतंत्र पथक नेमण्यात आले आहे. पोलीस अंमलदार विजय पवार, विनोद चव्हाण व ओमकार कुंभार यांना बातमी मिळाली की, सहकारनगर भागात टेम्पोमधून मोठ्या प्रमाणावर हातभट्टी दारुची अवैध दारू वाहतूक होत आहे. त्याप्रमाणे युनिट २ कडील सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसळ व त्यांचे पथकाने मिळालेल्या बातमीप्रमाणे ३ नोव्हेबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता बालाजीनगर येथील के के मार्केट येथील सी एन जी गॅसपाईप लाईनजवळ थांबलेल्या टेम्पोला पकडले. त्यातून २४ हातभट्टी दारूचे कॅन्ड (८४० लिटर हातभट्टी दारुसह) ८ लाख ३३ हजार २०० रुपयांचा माल जप्त केला आहे.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसळ, पोलीस उपनिरीक्षक नितीन कांबळे, पोलीस अंमलदार विजय पवार, विनोद चव्हाण, ओमकार कुंभार, संजय जाधव, उज्वल मोकाशी, निखिल जाधव, राहुल शिंदे यांनी केली आहे.