Pune : इन्कम टॅक्स आणि फूड ऑफिसर बनून व्यावसायिकांना गंडा घालणार्‍याला गुन्हे शाखेडून अटक, 5 गुन्हयांची उकल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  इन्कम टॅक्स आणि फूड ऑफिसर म्हणून व्यावसायिकांना गंडा घालणाऱ्याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. त्याने हडपसर येथील एका सराफी व्यवसायिकाला इन्कम टॅक्स ऑफिसर बोलत असल्याचे सांगत फसविण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्याकडून राज्यातील 5 गुन्हे उघडकीस आले आहेत.

राहुल किरण सराटे (वय 27 रा. चेंबूर ईस्ट, मुंबई) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

फिर्यादी यांचे औरंगाबाद तसेच हडपसर भागात सराफी दुकान आहे. यादरम्यान त्यांना एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. तसेच, इन्कम टॅक्स ऑफिसर राजेंद्र कदम बोलतोय, तुमच्याविरुद्ध एका महिलेने तक्रार दिली असून, तिने कमी प्रतीचे सोने दिले असल्याचे सांगितले आहे. जर तुम्हाला दुकान सील करायचे नसेल तर 37 हजार 200 रुपये ऑनलाइन भरण्यास सांगत खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला होता.

याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास खंडणी विरोधी पथक दोनचे अधिकारी व कर्मचारी करत होते. यावेळी त्रांतीक विश्लेषण केले असता तो राहुल सराटे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, सहाय्यक आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, उपनिरीक्षक विजय झंझाड, कर्मचारी विनोद साळुंखे, सुरेंद्र जगदाळे, भूषण शेलार, अमोल पिलाने, प्रदीप शितोळे व त्यांच्या पतगकाने सापळा रचून अटक केली. त्यावेळी त्याने गुन्ह्यांची कबुली दिली. अधिक तपास केल्यानंतर त्याच्याकडून चेंबूर, पुणे, बेंगलोर, अंधेरी यासह इतर असे 5 गुन्हे उघडकीस आले आहेत.

तर त्याने कोल्हापूर, नवी मुंबई, मुंबई यासह इतर जिल्ह्यातील 10 जणांना असेच फसवले असल्याची माहिती मिळाली आहे. त्यानुसार त्याच्याकडे तपास सुरू असून, तो इन्कम टॅक्स ऑफिसर किंवा फूड ऑफीसर म्हणून फसवत असे.