Pune : लष्कर परिसरात झालेल्या ‘त्या’ खून प्रकरणाचा पर्दाफाश, गुन्हे शाखेकडून मारेकर्‍याला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  लष्कर परिसरात फिरस्त्याचा डोक्यात मारहाणकरून झालेल्या खुनाचा छडा लावण्यात गुन्हे शाखेला यश आले असून, 24 तासात यातील आरोपीला अटक करण्यात आली आहे. नशापाणी येथे करत जाऊ नको, असे बोलत असल्याने त्याने हा खून केल्याचे समोर आले आहे.

मोहम्मद आझाद शाह (वय 26) असे अटक केलेल्याचे नाव आहे. यात इस्माईल शेख (वय 65) यांचा खून झाला आहे. याप्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. लष्कर परिसरत मोडीखाना येथील म्हशीच्या गोठ्याजवळ राहत असलेल्या एका फिरस्त्याचा डोक्यात बेदम मारहाण करून खून करण्यात आल्याची घटना घडली होती. सकाळी हा प्रकार समोर आल्यानंतर गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शोध सुरू केला होता.

या गुन्ह्यात खून झालेल्या व्यक्तीची ओळख देखील पटली नव्हती. प्रथम त्याची ओळख पटवण्यात आली. तो येथे एका ताडपत्रीचे घर करून राहत होता. तसेच, येथेच राहून गुजारण करत असे. दरम्यान त्याची ओळख पटल्यानंतर त्याचा खून कोणी आणि का केला, याचा तपास सुरू केला होता. यादरम्यान गुन्हे शाखेच्या युनिट दोनला आरोपीची माहिती मिळाली. त्यानुसार सहाय्यक निरीक्षक मोरे व त्यांच्या पथकाने त्याला सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने खुनाची कबुली दिली. त्यानुसार त्याला अटक करण्यात आली.

आरोपीला नशा करण्याची सवय होती. तो सतत येथे येऊन नशा करत असे. यामुळे शेख यांनी त्याला नशा करण्यास विरोध करत “तू गावी निघून जा, येथे राहू नको” असे सांगत असे. या बोलण्याचा त्याला राग येत होता. रात्री आरोपी आल्यानंतर त्याने शेख यांच्या डोक्यात मारहाण करून त्यांचा खून केला आणि येथून निघूल गेल्याचे समोर आले आहे.

गुन्हे शाखेचे अप्पर आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, सहाय्यक निरीक्षक प्रकाश मोरे, वैशाली भोसले, पोलीस अंमलदार यशवंत आब्रे, अस्लम पठाण, किशोर वग्गु, उत्तम तारू, मितेश चोरमोले, समीर पटेल, गोपाळ मदने व मोहसीन शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.