वॉर्डबॉयला चाकूच्या धाकाने लुटणार्‍या दोघा सराईतांना गुन्हे शाखेकडून अटक, ऐवज जप्त

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   मध्यरात्री एका वॉर्डबॉयला चाकूचा धाक दाखवत लुटणाऱ्या दोन सराईत गुन्हेगाराना गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून 7 मोबाईल व 1 दुचाकी जप्त करण्यात आली आहे. दोघे सराईत गुन्हेगार असून, दोघे पॅरोल सुटल्यानंतर गुन्हे करत होते.

व्यंकटेश दत्ता तगारे (वय ३५, रा. खडकी रेल्वे स्टेशनजवळ) व सनी सतीश गायकवाड (वय २७, रा. का मगार मैदान, मुंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

वडगाव शेरी येथे राहणारे वॉर्ड बॉय किरण शिंदे हे एक ऑगस्ट रोजी रात्री पायी जात होते. त्यावेळी आरोपी हे दुचाकीवरून आले. त्यांना लिफ्ट देण्याच्या बहाण्याने काही अंतरावर घेऊन जात चाकू गळ्याला लावत लुटले. याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता.

गुन्ह्याचा समांतर तपास युनिट चार करत होते.फिर्यादी यांनी दिलेल्या वर्णानावरून वरिष्ठ निरीक्षक अंजुम बागवान, उपनिरीक्षक विजय झंजाड हे आरोपीचा माग काढत होते. त्यावेळी पोलिस कर्मचारी सचिन ढवळे यांना तांत्रिक विश्लेषानावरून आरोपी खडकी परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार उपनिरीक्षक झंझाड, कर्मचारी सुनील पवार, सुरेंद्र साबळे, विशाल शिर्के, सापळा रचून त्यांना खडकी परिसरातून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक तपास केल्यानंतर त्यांनी वॉर्डबॉयला लुटल्याचे सांगितले. या दोघांकडे अधिक तपास केला असता बंडगार्डन, आकुर्डी, रेल्वे स्टेशन परिसरातून मोबाईल चोरल्याची कबुली दिली. तसेच, त्यांच्याकडील दुचाकी ही देहूरोड परिसरातून चोरल्याचे सांगितले. त्यानुसार सात मोबाईल व एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे. रमेश राठोड, अब्दुल सय्यद, गणेश साळुंके, सागर घोरपडे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

——-चौकट—–

पॅरोवर सुटल्यानंतर गुन्हे

आरोपी तगारे हा सराईत असून त्याच्यावर ५५ गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यात तो येरवडा कारागृहात होता. मात्र, सध्या करोनाच्या पार्श्वभुमीवर कैद्यांना पॅरोल व तात्पुरत्या जामीनावर सोडले जात आहे. तगारे हा सुद्धा काही दिवसांपूर्वी पॅरोलवर बाहेर आला होता. सुरवातीला काही दिवस मित्राकडून उधार पैसे घेऊन उदरनिर्वाह केला. काही दिवस कामाला गेला. पण, दारूचे व्यसन असल्यामुळे भागत नव्हते. त्यामुळे त्याने पुन्हा गुन्हे करण्यास सुरवात केल्याचे समोर आले आहे.