पुणे : चैन स्नॅचिंग अन् वाहन चोर्‍या करणार्‍या सराईताला पकडले, गुन्हे शाखेची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात चैन स्नॅचिंग आणि वाहन चोर्‍या करणार्‍या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून 18 गुन्ह्यांची उकल करत साडे सहा लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. शब्बीर जावेद जाफरी (वय 32, रा. लोणीकाळभोर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याने साथीदार दाबुभाई इराणी याच्या मदतीने गुन्हे केले आहेत.

जाफरी हे सराईत गुन्हेगार असून, त्यांनी छत्तीसगड आणि मध्यप्रदेशातही गुन्हे केले असून, येथील 20 ते 25 गुन्ह्यात फरार असल्याचे सांगण्यात आले. शहरात चैन स्नॅचिंग आणि वाहन चोरीचे गुन्हे दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यातही वाहन चोरटे दररोज चार ते पाच वाहने चोरून नेत आहेत. दरम्यान, गुन्हे शाखा तसेच स्थानिक पोलिसांना पाहिजे आरोपी आणि सराईत गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांना जेरबंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, गुन्हे शाखा युनिट पाच हद्दीत गस्त घालत होते.

यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सराईत गुन्हेगार हडपसर परिसरात येणार आहे. त्यानुसार, पोलिसांनी याठिकाणी सापळा रचून त्याला पकडले. त्याच्याजवळील दुचाकीबाबात चौकशी केली असता त्याने दुचाकी चोरल्याचे सांगितले. ही दुचाकी त्याने परभणी जिल्ह्यातून चोरल्याचे समोर आल्यानंतर त्याला या गुन्ह्यात अटक केली. त्याच्याकडे सखोल तपास केला असता त्याने साथीदाराच्या मदतीने शहरातील विविध भागात वाहने चोरल्याचे तसेच चैन स्नॅचिंगचे गुन्हे केल्याचे कबूल केले.

त्यांच्याकडून चैन स्नॅचिंगचे 10 गुन्हे, वाहन चोरीचे 4 आणि हातचालाखीने फसवणूक करण्याचे 4 असे 18 गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यांच्याकडून 6 लाख 36 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दत्ता चव्हाण, संतोष तासगांवकर, उपनिरीक्षक शेंडगे, संतोष मोहिते, प्रदीप सुर्वे, राजेश रणसिंग, दत्ता काटम, महेश साळवी, बंडु शिंदे, संजय देशमुख, महेश वाघमारे, प्रविण काळभोर, अश्रुबा मोराळे, सचिन घोलप यांच्या पथकाने केली.

Visit : Policenama.com

You might also like