उस्मानाबाद जिल्ह्यात खून, पुण्यात आलेल्या गुन्हेगाराना अटक, गुन्हे शाखेची कारवाई

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यात एकाचा खुनकरून पुण्यात आलेल्या दोघांना गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पथकाने सापळा रचून अटक केली. वडिलांच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी त्यांनी खून केला आहे.

श्री मंगेश चौधरी (वय 20, रा. काकडे पॅलेसजवळ, कर्वेनगर) आणि सागर प्रकाश ढोकणे (वय 19) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. यात दिगंबर दूधभाते (वय 40) यांचा खून झाला आहे. याप्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

दिगंबर दुधभाते व नातेवाईक आरोपी अक्षय दुधभाते याने त्याच्या साथीदार आरोपीनी मिळून बेदम मारहाणकरून खून केला होता. खुनानंतर दोघे आरोपी उमरगा येथून पसार झाले होते. उस्मानाबाद पोलीस त्यांचा शोध घेत होते.

दरम्यान पुणे पोलिसांकडून सराईत गुन्हेगार व पॅरोलवर बाहेर आलेल्या गुन्हेगारावर नजर ठेवली जात आहे. त्यादरम्यान युनिट चारचे पोलीस हवालदार सुनील पवार यांना माहिती मिळाली की उस्मानाबाद जिल्ह्यात खून करून पसार झालेले दोघे पाषाण भागात आले आहेत. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक अंजुम बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक गणेश पवार, पोलीस हवालदार सुनील पवार, कर्मचारी भालचंद्र बोरकर, राजू मचे, विशाल शिर्के, दत्तात्रय फुलसुंदर, सुहास कदम व गणेश काळे यांच्या पथकाने त्या दोघांना सापळा रचून ताब्यात घेतले. त्यांनी खुनाची कबुली. त्यांना पुढील तपासासाठी उमरगा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.