Pune News : लातूरमध्ये एकावर खुनी हल्ला करणार्‍यांना पुण्यात गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  लातूरात एकावर खुनी हल्ला करून पसार झालेल्या दोघांना पुण्यात अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने या दोघांना पकडले आहे.

अमोल ज्योतीराम गंभीरे (वय 24, मुक्काम पोस्ट सिकंदरपुर, तालुका जिल्हा लातूर) आणि प्रतीक अंतराम माने (वय 23, राहणार माताजी नगर, लातूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यावर लातूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

शहरात गुन्हे शाखेकडून सराईत गुन्हेगार व पाहीजे आरोपींची माहिती काढली जात आहे. यादरम्यान गुन्हे शाखा युनिट एकचे पथक हद्दीत गस्त घालत होते. यावेळी पोलिस कर्मचारी दत्ता सोनवणे यांना माहिती मिळाली की लातूर येथे खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल असलेले दोघे न-हे येथे थांबले आहेत. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने नवले हॉस्पिटल नर्‍हे येथील पुलाखाली संशयास्पदरीत्या थांबलेल्या या दोघांना पकडले. त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांना लातूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई उपनिरीक्षक सुनील कुलकर्णी, दत्ता सोनवणे, सचिन जाधव, इम्रान शेख, शशिकांत दरेकर, महेश बामगुडे यांच्या पथकाने केली आहे.