पुण्यात मांडूळ विक्रीस आलेल्या दोघांना गुन्हे शाखेनं पकडलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   येरवडा परिसरात 22 लाखांचे मांडूळ विक्रीस आलेल्या दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून 22 लाखांचे मांडूळ जप्त करण्यात आले आहे.
महेश भिमाजी थोरात (वय 29, रा. आणे, ता. पुरंदर) व चंद्रकांत काशिनाथ देशमुख (वय 50, रा. कौतुळ, ता. अकोले, जि. अहमदनगर) अशी अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी यरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरात घरफोड्या तसेच लूटमार आणि चोऱ्या करणाऱ्या टोळ्यांनी चांगलाच धुडगूस घातला आहे. यावर लक्ष केंद्रित करण्याचे आदेश गुन्हे शाखा व स्थानिक पोलिसांना देण्यात आले आहेत. दरम्यान गुन्हे शाखा युनिट दोनचे पथक या परिसरात गस्त घालत असताना त्यांना दोघेजण जेल रोड परिसरात उभे असून ते मांडूळ विक्रीसाठी आले असल्याचे समजले. त्यानुसार उपायुक्त बच्चन सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जगताप व पथकाने याठिकाणी छापा टाकला. त्यांची झडती घेतली असता 3 किलो वजनाचा व 44 इंच लांबीचा मांडूळ मिळाले. त्याची 22 लाख रुपये किंमत असल्याचे सांगण्यात आले आहे.

महेश हा शेतकरी आहे. त्याने कोठून मांडूळ आणले व ते कोणाला विक्री करणार आहेत, याबाबत तपास सुरू आहे. दोघांना येरवडा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.