पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Crime Branch | कोंढव्यातील नातेवाईकाच्या कार्यक्रमासाठी गेलेल्या गुंडांनी लक्ष्मीनगरमध्ये पहाटे ९ वाहनांची तोडफोड करुन दहशत माजविली होती. या गुंडांपैकी ४ जणांना गुन्हे शाखेच्या युनिट ५ च्या पथकाने पकडले.
नवाज अजीज शेख (वय २०), अल्फाज मुर्तजा बागवान (वय २०), यश विजय सारडा (वय १९), अमन कबीर इनामदार (वय२०, सर्व रा. मिनाताई ठाकरे वसाहत, गुलटेकडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत अविनाश शिवाजीराव देशमुख (वय २२, रा. लक्ष्मीनगर, कोंढवा) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार लक्ष्मीनगर लेन. नं. ३ तसेच आश्रफनगर गल्ली नं. ७ येथे १६ एप्रिल रोजी पहाटे साडेचार ते पाच वाजेच्या दरम्यान घडला होता.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढव्यातील एका नातेवाईकाच्या कार्यक्रमासाठी गुलटेकडी येथील ही मुले गेली होती. कार्यक्रमानंतर पहाटेच्या सुमारास त्यांच्यात वाद झाला. त्यावेळी या मुलांनी दहशत माजविण्यासाठी परिसरात मोठमोठ्यांनी आरडाओरडा करुन शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. लक्ष्मीनगर व आश्रफनगरमध्ये पार्क केलेल्या ९ चारचाकी वाहने, रिक्षांची तोडफोड करुन लाखो रुपयांचे नुकसान केले. या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखेचे युनिट ५ चे पथक करत होते. सहायक पोलीस फौजदार राजस शेख व पोलीस अंमलदार पृथ्वीराज पांडुळे यांना माहिती मिळाली की, तोडफोड करणारे हे गुंड गुलटेकडी येथील राहणारे आहेत. त्यानुसार पोलिसांनी डायस प्लॉट परिसरातून या चार जणांना पकडले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी साथीदारांच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांना कोंढवा पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केले असता अधिक तपासासाठी न्यायालयाने त्यांना दोन दिवस पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, पोलीस अंमलदार राजस शेख, पृथ्वीराज पांडुळे, विनोद शिवले, तानाजी देशमुख, सचिन मेमाणे, अकबर शेख, उमाकांत स्वामी, संजयकुमार दळवी, सुहास तांबेकर, पल्लवी मोरे, स्वाती तुपे यांनी केली आहे.