पुण्याच्या गुन्हे शाखेकडून हडपसर परिसरातील हातभट्ट्यांवर ‘रेड’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – हडपसर परिसरात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी हातभट्टीवर दारु बनविण्यासाठी लागणार्‍या रसायनाचा साठा उध्द्वस्त केला आहे. एकाला अटक करत त्याच्याकडून 25 हजार लीटर रसायन, 200 लीटर दारु व 3 हजारांची रोकड मिळून 55 हजारांचा ऐवज जप्त केला.

श्रीकांत शहाजी बिनावत (वय 37, रा. महंमदवाडी) असे जेरबंद केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील अवैध धंदे तसेच पाहिजे आरोपी व सराईतांची माहिती काढून त्यांना जेरबंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, गुन्हे शाखा युनिट पाचचे पथक हडपसर परिसरात गस्त घालत होते.

त्यादरम्यान, कंजारभाट वस्तीत एका पत्र्याच्या शेडमध्ये हातभट्टी दारु तयार होत असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक संतोष तासगांवकर व उपनिरीक्षक सोमनाथ शेंडगे यांना मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेने त्याठिकाणी छापा टाकून श्रीकांतला ताब्यात घेतले. हातभट्टी बनविण्यासाठी आवश्यक 25 हजार लीटर रसायन, 200 लीटर दारु जप्त केले. ही कामगिरी पोलीस उपायुक्त बच्चन सिंह, सहायक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार, विजयकुमार चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा पाच आणि सामाजिक सुरक्षा विभागातील कर्मचार्‍यांनी केली.