पॉश बंगल्यामध्ये चालणार्‍या जुगार अड्डयावर गुन्हे शाखेकडून छापा : 26 ‘प्रतिष्ठीत’ जुगारी ताब्यात

27 मोबाईलसह पावणे 7 लाखाचा ऐवज जप्‍त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बिबवेवाडी परिसरातील एका पॉश बंगल्यात चालणार्‍या मोठया जुगार अड्डयावर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुरूवारी दुपारी छापा टाकला. पोलिसांनी जुगार अड्डा (क्‍लब) चालविणार्‍यासह मॅनेजर आणि जुगार खेळणार्‍या अशा एकुण 26 जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी तब्बल 27 मोबाईलसह 6 लाख 73 हजार 660 रूपयाचा ऐवज आणि जुगार खेळण्याचे साहित्य जप्‍त केले आहे. गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्‍त भानुप्रताप बर्गे आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले सर्वजण हे परिसरातील प्रतिष्ठीत असल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी क्‍लबचा मालक योगेश किशोर नांगरे, मॅनेजर शेंडे गुंडेराव कडाजीराव, बबन जगन्‍नाथ मानकर, अशोक अजिनाथ डोंगरे, प्रशांत पंढरीनाथ घुले, संतोष चंद्रशेखर वागळे, अब्दुल हमीद मलिक, सचिन नामदेव जोगदंड, मुंजाळ श्रीराम रावसाहेब, कोंढरे राकेश अरूण, नवनाथ हनुमंत लष्करे, ज्ञानदेव विठोबा चौघरी, दरेकर अंकुश आत्माराम, किशोर रामचंद्र पाटोळे, सचिन शिवाजी जाधव, कल्याणी रविसिंग, पठाण शब्बीर इब्राहीम, जाधव बिरेंदर सुरेश, वाडेकर सुहास शांताराम, अजय कुमार, राऊत गौतम शितल, सोनवणे गौरव दिपक, कांबळे बबलु गोविंद, काळभोर अजय बाजीराव, नंदकिशोर राम आणि कल्याणी मखनसिंग अजितसिंग यांना ताब्यात घेतले आहे.

बिबवेवाडी परिसरातील स्वामी समर्थनगर येथील बंगला क्रमांक 21 मध्ये एक मोठा जुगार अड्डा (क्‍लब) चालु असून तेथे मोठया प्रमाणावर जुगारी लोक दररोज जुगार खेळण्यासाठी एकत्र येतात अशी गोपीनीय माहिती गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्‍त भानुप्रताप बर्गे यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीची खातरजमा करण्यात आली. पोलिस आयुक्‍त डॉ. के. व्यंकटशेम, गुन्हे शाखेचे उपायुक्‍त शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्‍त भानुप्रताप बर्गे, सहाय्यक निरीक्षक अश्‍विनी जगताप, पोलिस पथकातील शंकर संपते, निलेश पालवे, सुधीर इंगळे, राहुल सकट आणि प्रमोद माळी यांच्या पथकाने क्‍लबवर छापा टाकला.

छाप्यामध्ये जुगार खेळण्याचे साहित्य, वेगवेगळया कंपनीचे तब्बल 27 मोबाईल फोन, रोख रक्‍कम आणि इतर ऐवज असा एकुण 6 लाख 73 हजार 660 रूपयाचा ऐवज जप्‍त करण्यात आला आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास बिबवेवाडी पोलिस करीत आहेत. दरम्यान, या क्‍लबमध्ये तिरट, रम्मी आणि इतर जुगार चालत असल्याची माहिती समोर आली आहे.