पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून 120 किलो गांजा जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – विशाखापट्टनम् येथून तस्करीकरून मुंबईत गांजा घेऊन जाणाऱ्या टोळीला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पकडले. पुण्यातील हडपसर परिसरात ही कारवाई केली. तर गांजा घेऊन गेलेले टेम्पो पाठलागकरून खोपोली भागात पकडले. पोलिसांनी 120 किलो गांजासह 34 लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. हिमायतउल्ला मोहम्मद अली शेख (वय-४१ रा. अंधेरी वेस्ट मुंबई) व अश्विन शिवाजी दानवे (वय-२६ रा. अंधेरी मुंबई) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गांजाची वाहतूक करताना संशय येऊ नये म्हणून शहाळ्याची वाहतूक करणाऱ्या वाहनातून गांजा नेला जात होता. शहरात अमली पदार्थ तस्करांची सध्या मोठी चलती आहे. काही प्रकरण पोलिसांकडून समोर येत आहेत.

मात्र छुप्या पद्धतीने सध्या याची शहरात मोठ्या प्रमाणात विक्री सुरू आहे. यामुळे अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी स्वतः लक्ष घालत कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच परिसरात गस्त घालण्यात येत होती. यावेळी अमली पदार्थ विरोधी पथकाला दोन कारमधून विशाखापट्टनम् येथून मुंबईत गांजा जाणार असल्याचे समजले. त्यानुसार या माहितीची खातरजमा करण्यात आली. तसेच सापळा रचून आरोपींचा माग काढण्यास सुरुवात केली. त्यावेळी आज हा गांजा शहरातून जाणार असल्याचे समजले. यानुसार टोळी पकडण्यास पोलिसांनी आज पहाटे पाच वाजेपासून हडपसर भागात सापळा रचला होता. दुपारी तीनच्या सुमारास दोन्ही गाड्या येताच त्यांच्यावर छापा टाकून त्यांना पकडले.

पोलीस उपायुक्त बच्चन सिंह, सहायक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते, उपनिरीक्षक संजय गायकवाड, हवालदार मगर, गरुड, शिंदे, काळभोर, वांजळे, बागवान, पवार, येलपले यांच्या पथकाने दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी मालवाहतूक करणाऱ्या वाहनातून शहाळ्याखाली दडवून गांजा मुंबईला पाठविला असल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी वाहनाचा पाठलाग करून खोपोली परिसरात टेम्पो चालकाला ताब्यात घेतले. नारळाच्या शाहळेच्या खाली लपवलेला ७२ किलो गांजा मिळून आला. दोन्ही गाडीतील मिळून एकूण १२० किलो गांजा, १ स्कोडा गाडी, १ छोटा हत्ती, विशाखापटनम ते बडोदराचा रिटर्न ईपास,१ आंध्रप्रदेश पासिंग असलेली खोटी नंबर प्लेट असा एकूण ३४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like