पुण्यात गुन्हे शाखेकडून मोठा शस्त्रसाठा जप्त, 7 पिस्तुल अन् 12 काडतुसांचा समावेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – 24 गुन्हे दाखल असणार्‍या एका सराईत गुन्हेगार आणि त्याच्या साथीदाराकडून गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पथकाने मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. त्यांच्याकडून तब्बल 7 पिस्तूल आणि 12 काडतूसे जप्त केली आहेत. तर, या गुन्ह्यात प्रथमच पोलिसांनी मध्यप्रदेशातील एका व्यापार्‍यावरही गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडून आणखी काही पिस्तूल मिळण्याची शक्यता आहे.

रोहन उर्फ दुध्या सुभाष चव्हाण (वय 33, रा. सोमवार पेठ, दारूवाला पुल) व चंद्रशेखर रामदास वाघेल (वय 30, रा. मुंकुदनगर) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्यावर समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील पाहिजे आरोपी अन् सराईत गुन्हेगारांची माहिती काढून त्यांना जेरबंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार, गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलीस हद्दीत गस्त घालत आहेत.

त्यानुसार, युनिट चारचे पथक समर्थ पोलिसांच्या हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस हवालदार सुनिल पवार यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, रास्ता पेठेतील समर्थ व्यायाम शाळेजवळ दोन सराईत गुन्हेगार उभे आहेत. त्यानुसार, पथकाने या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी पिस्तूल विक्रीसाठी आणल्याची माहिती दिली. त्यानुसार, त्यांच्याकडून एकूण 7 पिस्तूल आणि 12 काडतूसे जप्त केली आहेत.

रोहन हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर जबरी चोरी, दरोड्याची तयारी, हत्यार बाळगणे, विक्री करणे यासारखे यापुर्वीचे 23 गुन्हे दाखल आहेत. तर, वाघेल याच्यावर खूनाच्या प्रयत्नाचा एक गुन्हा दाखल आहे.

रोहन याला 2016 मध्ये मध्यप्रदेशातील सेंधवो येथे पिस्तूल खरेदीकरून येताना मध्यप्रदेश पोलिसांनी पकडले होते. त्यावेळी त्याच्याकडून 8 पिस्तूल जप्त केले होते. त्यावेळी देखील पोलिसांनी रोहन याने खरेदी केलेल्या आरोपीला पकडले होते. तर, जून 2019 मध्येही त्याला फरासखाना पोलिसांनी पकडले होते. त्यावेळी दोन पिस्तूल जप्त केले होते. दोघे पिस्तूल मध्यप्रदेशमधून आणून पुण्यात विक्री करत होते.

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त बच्चन सिंह, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, उपनिरीक्षक विजय झंजाड, कर्मचारी सुनिल पोलीस पवार, विशाल शिर्के, सचिन ढवळे, अतुल मेंगे, निलेश शिवतरे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

रोहन याला आई-वडिल नाहीत. तो 2011 पासून गुन्हेगारी करत आहे. 2012 नंतर त्याने गुन्हेगारी बंद केली होती. पुन्हा तो 2019 मध्ये गुन्हे करत असताना पकडले होते. तर, वाघेल हा फूड सप्लायचे काम करण्याचे काम सुरू केले होते. रोहन याला मध्यप्रदेशात पकडल्यानंतर तेथील कोर्टात तारखेला गेल्यास तो पिस्तूल घेऊन येत असत. त्यानंतर तो पुण्यात त्याची विक्री करत होता. त्याने यापुर्वी कोणाला पिस्तूल विक्री केली आहे. याची माहिती घेतली जात आहे. मध्यप्रदेशातून 10 ते 12 हजार रुपयांना पिस्तूल घेत असे आणि तो पुण्यात 20 ते 25 हजार रुपयांना विकत घेत होता.

युनिट तीनने सराईतला पकडले

गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने एका सराईत गुन्हेगाराला पकडून अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतूस जप्त केले आहेत. परवेज इकबाल पटवेकर (वय 25, रा. गुरूवार पेठ) असे पकडलेल्याचे नाव आहे. त्याच्यावर खून, खंडणी तसेच दुखापत यासारखे गुन्हे दाखल आहेत.