Pune : अत्यावश्यक सेवेचा स्टीकर अन् टेम्पोमध्ये 10 लाखाचा गुटखा, गुन्हे शाखेकडून दोघांना अटक

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – अत्यावश्यक सेवेचा बोर्ड लावून टेम्पोतून अवैधरित्या १० लाखाचा विमल गुटखा व तंबाखूची वाहतूक करणाऱ्या दोघांना खंडणी व अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्यांच्याकडून टेम्पो व गुटखा असा १२ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.

मंदार राजेंद्र ठोसर (रा. शिवराज चौक, हडपसर) व मनोज सुमतीलाल दुगड (रा. भेकराईनगर, फुरसुंगी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खंडणी व अमली पदार्थ विरोधी पथक हडपसर परिसरात गस्त घालत होते. यावेळी कर्मचारी अमोल पिलाणे व प्रमोद टिळेकर यांना फुरसुंगी परिसरात उच्चभ्रू भक्ती विहार सोसायटीत दोघेजण अवैधरित्या विमल पानमसाला व तंबाखूची वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून मंदार ठोसर आणि मनोज दुगड याला ताब्यात घेतले. त्यांच्याकडील टेम्पोची तपासणी केली असता, त्यामध्ये अवैधरित्या विक्रीसाठी चालविलेला १० लाखांचा विमल पानमसाला आणि तंबाखू मिळून आली.
पोलीस उपायुक्त बच्चन सिंह, पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते, उपनिरीक्षक नीलेशकुमार महाडिक, अमोल पिलाणे, उदय काळभोर, रमेश गरुड, मोहन येलपले, प्रमोद टिळेकर यांच्या पथकाने केली.

गुटख्याच्या वाहतूकीसाठी दोघांनी अत्यावश्यक सेवेचा बोर्ड अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करण्यासाठी व पोलिसांनी वाहनाची तपासणी करु नये, यासाठी आरोपींनी टेम्पोच्या दर्शनी भागावर अत्यावश्यक सेवा असा बोर्ड लावला होता. मात्र, पोलिसांच्या नजरेतून हा प्रकार सुटला नाही.