Coronavirus Lockdown : ‘लॉकडाऊन’चा आदेश फाट्यावर मारून पेट्रोलची विक्री करणार्‍या पुण्यातील 7 पंपावर पोलिसांची कारवाई

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – शहरात संचारबंदी आणि वाहने रस्त्यावर अण्यास मनाई केल्यानंतर सर्व सामान्य नागरिकांना पेट्रोल न देण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, त्यानंतर देखील पेट्रोल देण्यात येत असल्याने गुन्हे शाखेच्या पथकांनी छापेमारी करत कारवाई केली आहे. त्यांच्यावर 188 नुसार गुन्हे दाखल केले आहे.

शुक्रवार पेठेतील इंडियन ऑईल पेट्रोल पंप, डेक्कन येथील बी. यु. भंडारी सर्व्हिस सेंटर पेट्रोल पंप, कोथरूड येथील साई सायकी सीएनजी स्टेशन पेट्रोल पंप, सोलापूर रस्त्यावरील हायवे पेट्रोल पंप धरुवाला इंटरप्रायझेस, रेल्वे स्टेशन भागातील ऑटो फ्युअल पेट्रोल पंप, वाकडेवाडीमधील अल्फा सर्व्हिस स्टेशन पेट्रोल पंप आणि मांजरी येथील शिवाजी सर्व्हिस स्टेशन पेट्रोल पंप या पेट्रोल पंपावर कारवाई करण्यात आली असून, तेथील कामगार आणि पेट्रोल पंपाचे मालक यांच्यावर 188 नुसार कारवाई करण्यात आली आहे.

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना आजाराचा राज्यात देखील प्रादुर्भाव वाढला आहे. देशात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे राज्यात संचारबंदी करण्यात आली आहे. तर पुणे पोलिसांनी रस्त्यांवर वाहने घेऊन येणास बंदी घातली आहे. नागरिकांना विनाकारण बाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, नागरिक वाहने घेऊन फिरत आहेत. त्यामुळे शहरातील सर्व पेट्रोल पंप चालकांना अत्यावश्यक सेवेसाठी कार्यरत सर्व अधिकारी व कर्मचारी, कोरोना नियंत्रण व निर्मूलनासाठी कार्य करणारे तसेच अत्यावश्यक वस्तू व सेवा देणाऱ्या खासगी व्यक्ती आणि वैद्यकीय उपचार किंवा सहाय्यची गरज असणाऱ्या व्यक्तींशीवाय कोणाला पेट्रोल न देण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

तसेच लेखी आदेश काढण्यात आले आहेत. त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांना पेट्रोल देण्यात येत नाही. आपसूकच त्यामुळे नागरिकांना पेट्रोल भेटत नसल्याने घराबाहेर पडत येत नाही. मात्र शहरातील काही पेट्रोल पंपावर या आदेशाचे पालन होत नसून, अनेकांना पेट्रोल देण्यात येत असल्याचे समजले. त्यावेळी पोलिसांनी याची माहिती घेण्यास सुरुवात केली. यावेळी गुन्हे शाखेच्या सर्वच पथकांना खात्रीकरून कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. सोमवारी दिवसभरात कारवाई केली आहे.

गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त अशोम मोराळे, उपायुक्त बच्चन सिंह, सहाय्यक आयुक्त शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकांनी केली आहे. यापूढे देखील ही कारवाई सुरूच राहणार आहे. पेट्रोल पंप चालकांनी अत्यावश्यक किंवा ज्यांना पेट्रोल देण्याचे आदेश देण्यात आले आहेत, त्याव्यतिरिक्त कोणालाही पेट्रोल किंवा डिझेल देऊ नये असे आवाहन केले आहे. तसेच नागरिकांनी घराबाहेर न पडता सहकार्य करावे असे सांगण्यात आले आहे.