Lockdown : पुण्यात चढ्या दराने किराणा मालाची विकी, विदेशी दारू अन् सिगारेट विकणार्‍यांवर गुन्हे शाखेची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात विविध भागात संचारबंदी व लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चढ्या दराने किराणा मालाची विक्री करणाऱ्या दुकानासह सिगारेट आणि विदेशी दारू विकणाऱ्यावर छापे मारीकरून कारवाई केली आहे. याप्रकरणी स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत.

शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्फ्यू लावण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद ठेवल्या आहेत. मात्र, अनेकजण अत्यावश्यक सेवांच्या आडून नागरिकांना चढ्या दराने माल विक्री करत आहेत. तर काही ठिकाणी गुटखा आणि सिगारेट विकले जात आहेत. या सर्वांवर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

येरवडा परिसरात अमरजीत संधू (वय 25) हा त्याच्या जे. एम. अ‍ॅन्ड फास्ट फुड दुकानात तंबाखुजन्य पदार्थ व सिंगारेट विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दुकानावर छापा टाकून २ लाख २५ हजारंचे तंबाखुजन्य पदार्थ व विदेशी सिगारेट जप्त करण्यात आली. याप्रकरणात अमरजीत हरिजीकसिंग संधु (वय २५, रा. साकोरेनगर, विमाननगर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर येरवडा येथील शिला राज साळवे भाजी मंडई येथे गांजा विक्री करणार्‍या एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून ४६९ ग्रॅम वजानाचा सव्वा आठ हजारांचा गांजा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी अक्षय राजु चव्हाण (वय २७, रा. भाटनगर, येरवडा) याच्यावर येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच चतुःश्रृंगी येथील आकाश स्टोअर्स या दुकानात सिगारेट व हुक्का फ्लेवर ची विक्री होत आहे अशी माहिती पोलिसाना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून नवल नरेंद्र मिश्रा (वय २८ वर्ष रा. दुर्गानगर पिवळ्या कॉलनी जवळ मॉडेल कॉलनी ) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून सिगारेट व हुक्का फ्लेवर मिळून १ लाख ५८ हजारांचा माल जप्त केला.

महमंदवाडी येथील लक्ष्मीनगर येथे गावठी हातभट्टी दारू विक्रीच्या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकून ४ हजार ६०० रूपयांची गावठी हातभट्टीची दारू जप्त कण्यात आली. त्यानुसार सागर नवनाथ बिनावत याच्यावर वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर कॅम्प येथील सोलापूर बाजार येथे भाग्यलक्ष्मी सुपर मार्केट या दुकानात शेंगदाणे, खोबरे, मुग डाळ चढ्या भावाने विक्री करताना अशोक चुन्नीलाल माली (वय ३२ रा. सोलापूर बाजार, कॅम्प) याच्यावर गुन्हा दाखल करणत आला आहे. तसेच चतुःश्रृंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीतही न्यु प्रिन्स शॉपी या दुकानात शेंगदाणे चढ्या भावाने विक्री करत असताना श्रावणकुमार हेमाराज प्रजापती (वय ३५, रा. मोहननगर, अदिती हाईट्स, बाणेर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.