धक्कादायक ! ‘कोरोना’ झाल्याचं पाहुण्यांना सांगितलं, पुण्यातील रूग्णानं चक्क मित्रावर केले वार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना झाल्याची माहिती नातेवाईकांना दिल्याच्या कारणावरून एक रुग्णाने आपल्या मित्रावर वार केल्याची घटना पुण्यात घडली. कोरोना झाल्याची माहिती नातेवाईकांना दिल्याच्या रागातून होम क्वारंटाईन असलेल्या रुग्णाने मित्राच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून दगडाने बेदम मारहाण केली. ही घटना विश्रांतवाडी परिसरात घडली आहे.

या प्रकरणी शुभम सुरेंद्र प्रसाद (वय-23 रा. शांतीनगर, येरवडा) याने फिर्याद दिली आहे. शुभमच्या फिर्यादेनुसार विश्रांतवाडी पोलिसांनी संबंधित तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. अद्याप या तरुणावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्याचा होम क्वारंटाईनचा कालावधी संपल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात येईल असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

घटनेच्या दिवशी फिर्यादी शुभम हा मासे पकडून घरी जात होता. तक्रारदार शुभम यानेच आपल्याला कोरोना झाल्याची माहिती नातेवईकांना दिल्याचा गैरसमज आरोपीने करुन घेतला. यानंतर रागाच्या भरात त्याने आपल्या हातातील बिअरची बाटली शुभमच्या डोक्यात फोडली आणि त्यांनंतर त्याला दगडाने मारहाण केली. आरोपीला कोरोना झाल्याचे समोर आल्यानंतर त्याच्यावर 12 जुलै पर्यंत रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. त्यानंतर त्याला जिल्हा प्रशासनाकडून होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. पुढील तपास विश्रांतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणी करत आहेत.