पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – Pune Crime Court News | जादुटोणासारखे अघोरी कृत्य करुन व्यावसायिकांची २ कोटी ४० लाख रुपयांची फसवणूक करणार्या प्रकरणात अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी आर चौधरी यांनी महिलेचा जामीन अर्ज फेटाळून लावला.
अफिफा उर्फ इरम शोएब आत्तार (रा. बोपोडी) असे जामीन फेटाळलेल्या महिलेचे नाव आहे. कोणत्याही व्यक्तीचे आर्थिक नुकसान हे शारीरीक दुखापतीपेक्षा मोठे असते. आर्थिक नुकसान केवळ मानसिकच नाही तर सामाजिकदृष्ट्याही संपूर्ण कुटुंबाला त्रास देते. या टप्प्यावर खटला पुढे नेण्यासाठी पुरेसे पुरावे आहेत. तपास सुरु आहे. अद्याप अनेकांना अटक झालेली नाही. कट रचण्यात आला आहे. अशा परिस्थितीत जर आरोपींपैकी कोणीही जामिनावर सुटला तर तो तपासात अडथळा निर्माण करेल, असे कारण देऊन न्यायालयाने अफिफा आत्तार हिचा जामीन अर्ज फेटाळला आहे.
याप्रकरणात समर्थ पोलिसांनी नादीर अब्दुल हुसैन हसन अली नईमा आबादी (रा. सिनागग ईस्ट्रीट, कॅम्प), रोया उर्फ सीमा नादीर नईमा आबादी (वय ३५, रा. कॅम्प), मौलाना शोऐब मैनुद्दीन आत्तार (रा. बोपोडी), माजीद उस्मान आत्तार (रा. बोपोडी), खालीद मैनुद्दीन आत्तार (रा. बोपोडी), इरम शोऐब आत्तार (रा. बोपोडी) यांच्यावर महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियमन १९९९ चे कलम ३ चा अंतर्भाव करण्यात आला आहे. हा प्रकार ऑगस्ट २०२० ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत रास्ता पेठ येथे घडला. याबाबत शेख अब्दुल बासित अब्दुल लतिफ (वय ४५, रा. कोंढवा खुर्द) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आरोपी मौलाना शोएब व नादीर हे बांधकाम व्यावसायिक आहेत. आरोपींनी संगनमत करुन त्यांचा कोणताही इम्पोर्ट एक्सपोर्ट व्यवसाय नसताना या व्यवसायात पैसे गुंतवल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष फिर्यादी यांना दाखवले. त्यावर विश्वास ठेवून शेख यांनी वेळोवेळी त्यांच्याकडे २ कोटी ४० लाख रुपयांची गुंतवणूक केली. त्यानंतर आरोपींनी कोणताही परतावा न देता फसवणूक केली होती. याप्रमाणेच या आरोपींनी आणखी तिघांची फसवणूक केल्याचे गुन्हे तीन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. या चार गुन्ह्यांमध्ये एकूण ६ कोटी २३ लाख ५ हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली होती
.
या गुन्ह्यांमध्ये आरोपपत्र दाखल झाल्यानंतर या महिलेच्या वतीने जामीन अर्ज दाखल केला होता. तिने कोणतेही गुन्हे केलेले नाही. तिला खोट्या प्रकरणात सहभागी करुन घेण्यात आले आहे. तिचा या गुन्ह्याशी काहीही संबंध नाही. पतीच्या आदेशानुसार ती कधीही तक्रारदाराला किंवा त्याच्या पत्नीला गुंतवणुक करण्यास भाग पाडत नाही. त्यामुळे तिला जामिनावर सोडता येते, असे युक्तीवाद केला.
तपासी अधिकारी, सहायक पोलीस निरीक्षक दादा साहेब पाटील , सरकारी वकीलांनी व फिर्यादीच्या वतीने अॅड.अमेय सीरसीकर यांनी या अर्जाला तीव्र आक्षेप नोंदविला आहे. यातील सर्व आरोपींनी एकत्र येत फौजदारी स्वरुपाचा कट रचून फसवणूक केली आहे. तक्रारदाराकडून या जामीन अर्जावर आक्षेप घेताना अॅड.अमेय सीरसीकर यांनी सांगितले की, हा गुन्हा गंभीर स्वरुपाचा आहे. केवळ त्यालाच नाही तर इतर अनेक गुंतवणुकदारांना आरोपींनी फसवले आहे. सर्व आरोपींनी माहिती देणार्याला तसेच इतर व्यक्तींना शोएबच्या खात्यात गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले.
आरोपी महिला तिच्या पतीच्या व्यवसायात सक्रीय सहभाग घेते. तिच्यासोबत आर्थिक व्यवहार करतो. त्यामुळे ती थेट गुन्ह्यात सहभागी आहे. त्यामुळे तिचा जामीन फेटाळावा, असा युक्तीवाद करण्यात आला. तो ग्राह्य धरुन न्यायालयाने अफिफा शोएब आत्तार हिचा जामीन फेटाळून लावला. या प्रकरणातील पाहिजे आरोपी खालिद अत्तार याचा समर्थ पोलिस शोध घेत आहेत.