पुणे : Pune Crime Court News | उसने पैसे मागण्यावरुन दगड व काठीने मारहाण करुन जीवे ठार मारल्याप्रकरणी सत्र न्यायालयाने आरोपीला ७ वर्षाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. पी. जाधव (Judge P.P. Jadhav) यांनी हा निकाल दिला आहे.
भिमराव यशवंत खांडे (वय ५५, रा. वडकी) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. तर, चंद्रकांत शंकर चव्हाण असे खुन झालेल्याचे नाव आहे. ही घटना वडकी येथे १७ एप्रिल २०१९ रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली होती. उसने पैसे मागण्याच्या कारणावरुन भिमराव खांडे याने चंद्रकांत चव्हाण यांना दगड व लाकडी काठीच्या सहाय्याने जीवे ठार मारले. सहायक पोलीस निरीक्षक दिलीप कुमार यांनी गुन्ह्याचा तपास करुन भिमराव खांडे याच्याविरुद्ध सत्र न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. सहायक सरकारी वकील नामदेव तरळगट्टी यांनी कामकाज पाहिले. त्यांना कोर्ट पैरवी म्हणून ललिता कानवडे यांनी सहाय्य केले. प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांची साक्ष ग्राह्य धरुन न्यायालयाने भिमराव खांडे याला सात वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली.
परिमंडळ ५ चे पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी या कामगिरीकरीता प्रोत्साहन म्हणून कोर्ट पैरवी ललिता कानवडे, समन्स वॉरंट अंमलदार प्रशांत कळसकर, केस दत्तक अंमलदार रेश्मा कांबळे व तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना १० हजार रुपयांचे बक्षिस मंजूर केले आहे.