Video : पुण्यात धुळवडीला गालबोट, रंगाचे फुगे फेकण्यावरून तुफान वादावादी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात धुळवडीला गालबोट लागले असून, रंगाचे फुगे तयारकरून ते एकमेकांच्या अंगावर टाकण्याच्या कारणावरून चतुश्रृंगी भागात तुफान राडा झाल्याची घटना दुपारी घडली आहे. याघटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. याप्रकरणी चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चतुश्रृंगी परिसरात खैरेवाडी भागात तरूण धुळवड साजरी करत होते. यावेळी रंगाच्या पाण्याने भरलेले फुगे एकमेकांच्या अंगावर टाकण्यात येत होते. यावेळी हे फुगे टाकताला पार्किंग केलेल्या दुचाकीवर पडले. त्यावरून तरुणांमध्ये वादावादी झाली आणि या वादावादीचे रूपांतर तुफान राड्यात झाले. यानंतर काही वेळातच दहा ते पंधरा जणांच्या टोळके हातात दांडूके घेऊन परिसरात आले आणि त्यांनी वाहनांची तोडफोड करत तुफान राडा घातला.

अचानक दुपारी झालेल्या या प्रकारामुळे परिसरात चांगलीच दहशत माजली होती. नागरिकांची धावपळ उडालीच, पण लहान मुलेही घाबरून सैराभैर पळत होते. दरम्यान, ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. त्याचा व्हिडीओ व्हायरला झाला आहे.

याघटनेची माहिती मिळताच चतुश्रृंगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तक्रार देण्यास कोणीच येत नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे पोलीसांनीच सरकारतर्फे तक्रार देऊन आता या तरुणांचा शोध सुरू केला आहे. अद्याप कोणाला पकडण्यात आलेले नसल्याचे सांगण्यात आले आहे.