पुण्यात गावी जाण्यास नकार देणार्‍या पत्नीला पेटवलं, विवाहीता 60 टक्के भाजली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – गावी जाण्यास नकार देणाऱ्या पत्नीला पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अंगावर रॉकेल ओतून पेटविले असून यात विवाहिता 60 टक्याहून अधिक भाजली आहे. पोलिसांनी पतीला अटक केली आहे.

चांगुणा हरिदास जोगदंड (वय २२, कोंढवा) असे जखमी झालेल्या विवहातीचे नाव आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी हरिदास गंगाधर जोगदंड (वय २५, रा. गोकुळनगर, कोंढवा, मूळ. परभणी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गंगाधर हा एका पेट्रोल पंपावर काम करत होता. तर चांगुणा या एका मॉलमध्ये काम करतात.

दरम्यान गंगाधर याचा अपघात झाल्याने त्याचे काम सुटले होते. त्यामुळे तो पत्नी चांगुणा यांना आपण गावाला जाऊ असे म्हण होता. त्यावर चांगुणा यांनी गावाला जाण्यासाठी नकार दिला. यावरून या दोघांमध्ये दोन दिवसांपूर्वी सकाळी वादावादी झाली. या वादाचे रूपांतर भांडणात झाले. त्या रागात गंगाधर याने घरातील रॉकेलच्या बाटलीतील रॉकेल चांगुणा यांच्या अंगावर टाकून त्यांना पेटवून दिले. यामध्ये त्या ६० टक्के भाजल्या असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. अधिक तपास कोंढवा पोलिस करत आहेत.