पुण्यात पेट्रोल न दिल्यानं कामगाराला बेदम मारहाण

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – राज्यात संचारबंदी लागू केल्यानंतरही नागरिक बाहेर फिरत असल्याने पुणे पोलिसांनी रस्त्यावर वाहने अण्यास बंदी केली. तर सर्वसामान्य नागरिकांना पेट्रोल देण्यास मनाई केली आहे. मात्र एका दुचाकीस्वारास पेट्रोल न दिल्याने त्याने कामगाराला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. आरटीओ चौकात हा प्रकार रात्री घडला आहे. याप्रकरणी प्रमोद कदम (वय ३८, रा. मंगळवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून बंडगार्डन पोलिसांनी दाऊद गुड्डू नदाफ ( वय २७, रा. ताडीवाला रस्ता) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कदम हे येथील भारत पेट्रोल पंपावर काम करत आहेत.
करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी नागरिकांनी घर बंद केले आहे. तसेच रस्त्यावर गर्दी होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी कोणालाही पेट्रोल देऊ नये, असे आदेश दिले आहेत.
आपत्कालीन व्यवस्था वगळता कोणत्याही व्यक्तीला पेट्रोल पंपावर पेट्रोल, डिझेल तसेच सीएनजी गॅस देण्यास मनाई करण्यात आली आहे. गुरुवारी रात्री साडे नऊ वाजता आरोपी हा पेट्रोल भरण्यास दुचाकी घेऊन आला. गाडीत पेट्रोल भरावे, असे त्याने पंपवरील कर्मचाऱ्यांना सांगितले. त्यांनी नकार दिल्याने त्याचा वाद झाला.

त्यामुळे कदम यांनी हस्तक्षेप केला. सध्या संचारबंदी सुरू असल्याने केवळ अती आवश्यक सेवा करणाऱ्या वाहनांसाठी पेट्रोल देण्याचे आदेश आहेत, त्यामुळे तुम्हाला पेट्रोल देता येणार नाही, असे सांगितले.
याचा राग आल्याने आरोपीने जवळ पडलेला दगड हातात घेऊन कदम यांचा पाटलाग करून त्यांच्या डोक्यात घातला, अशी माहिती पोलिसांनी दिली. यामध्ये कदम जखमी झाले असून पुढील तपास पोलिस हवालदार एन एम मोमीन हे करत आहेत.