पुण्यात किरकोळ कारणावरून तिघांना मारहाण

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – येरवडा परिसरात पाण्यावरून झालेल्या भांडणात पत्नीला शिवीगाळ केल्याबाबत विचारणा करण्यास गेलेल्या तिघांना बेदम मारहाण केली. याप्रकरणी चौघांना अटक केली आहे.

मनोज सिसोदिया (वय ३८) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. तर, भाऊ लोकनाथ सिसोदिया व वहिनी हर्षदा हे देखील जखमी झाले आहेत. पोलिसांनी गणेश सुरेश ससाणे (वय २३), विवेक शाम शिंदे (वय २३), लखन पारधे (वय ३०) आणि शिवाजी लक्ष्मण भोवाळ (वय ३०, रा. माणिकनगर, लक्ष्मीनगर येरवडा) यांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज यांची पत्नी पाणी भरण्यासाठी गेल्यानंतर झालेल्या वादावादीत पारधे याने शिवीगाळ केली होती. त्याचा जाब विचारण्यासाठी तक्रारदार, त्यांचे भाऊ, वहिनी हे जाब विचारण्यास गेले होते. त्यावेळी आरोपींनी त्यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. यामध्ये मनोज यांचा हात फॅक्चर झाला आहे. तसेच, त्यांचे भाऊ देखील जखमी झाले. आरोपींनी मनोज यांच्या डोक्याट वीट घातल्यामुळे ते गंभीर जखमी झाले.उपचार केल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करून आरोपीना अटक करण्यात आली आहे.

अधिक तपास येरवडा पोलिस करत आहेत.