पुण्यात भिगवणच्या ‘मच्छी’वरून तरुणाला बेदम मारहाण, व्हिडीओ ‘व्हायरल’

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – राज्यात भिगवनची मच्छी फेमस आहे. पुण्यात शुक्रवारी दुपारी याच मच्छी देण्यावरून एका मच्छी विक्रेत्याला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. दरम्यान मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.

सुनील रमेश शिंदे (वय 36, आकाशवाणी, हपडसर), गणेश लक्ष्मण शिंदे (46), अनिल रमेश शिंदे उर्फ थोरवा (वय 32) आणि संजय गणपत सावंत (वय 46) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत राजू जगताप (वय 25) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजू हा मच्छी विक्रेता आहे. आरोपी व फिर्यादी एकाच परिसरातील आहेत. त्यांची तोंडओळख आहे. आरोपी सुनील शिंदे हाही मच्छी विक्रेता आहे. बुधवारी आरोपी सुनील हा फिर्यादीच्या घरी आला. तसेच मला भिगवन माल मिळालेला नाही. मला तुझ्याकडून माल पाहिजे असे सांगितले. मात्र फिर्यादी याने मच्छी देण्यास नकार दिला. यावरून त्यांच्यात वाद झाला होता.

त्यानंतर शुक्रवारी दुपारी फिर्यादीचा मित्र दत्ता चौगुले हा आला. त्याने तुला सुनीलने का शिवीगाळ केली. त्याला आपण जाब विचारू असे म्हणून आरोपींकडे नेले. यावेळी चौघेजण तेथे उभा होते. त्यांनी आरोपीला शिव्या का दिल्या असे विचारले. यावरून पुन्हा वाद झाला. यानंतर वादाचे रूपांतर भांडणात झाले. परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिक जमा झाले. त्यावेळी चौघांनी फिर्यादीला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच मारहाण करत रस्त्यावरून फिरवले. दरम्यान या सर्व घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात मोठ्या प्रमाणात गोंधळ झाल्याचे दिसत आहे. दरम्यान फिर्यादी याच्या कुटुंबीयांनी चौघा व्यतिरिक्त आणखी आरोपी असून त्यांना देखील अटक करावी अशी मागणी केली आहे. अधिक तपास हडपसर पोलीस करत आहेत.