शिवाजीनगर पोलीस वसाहतीत तरुणाला मारहाण

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – शिवाजीनगर पोलिस वसाहतीत तरुणांमध्ये किरकोळ कारणावरून तुंबळ मारामारी झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. यात एका तरुणाच्या डोक्यात फायटरने मारहाण केली गेली.

याप्रकरणी शुभम सुनिल दुबळे (वय १९, रा. शिवाजीनगर पोलिस वसाहत) याने फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रकाश बर्डे, योगेश कदम, पप्पू धनवडे (रा. शिवाजीनगर पोलिस वसाहत) यांच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व फिर्यादी याचा मित्र महेश जाधव याच्यात भांडण सुरू होते. ते भांडण दुबळे याने सोडविले. त्याचा राग आरोपींच्या मनात होता. त्यांनी शिवाजीनगर पोलिस वसाहत येथील बुध्द विहारजवळील चौकात बुधवारी सायंकाळी दुबळे याला अडविले. तू काय लय भाई लागून गेलास का असे बोलून बर्डे याने त्याच्याजवळील फायटर हातात घालून दुबळे याच्या डोक्यात मारहाण केली. तसेच, इतरांनी फिर्यादीला शिवीगाळ करून मारहाण केली. त्यानंतर आरोपी पसार झाले. उपचार करून पोलिसांकडे धाव घेतली. अधिक तपास शिवाजीनगर पोलिस करत आहेत.