कंटेन्मेंट झोनमध्ये 6 जणांचा राडा, वाहनांची तोडफोड

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – प्रतिबंधित क्षेत्र असताना देखील बिबवेवाडीत टोळक्याने वाहनांची तोडफोड करत दशहत निर्माण केल्याची घटना घडली. सहा जणांच्या टोळक्याने ही तोडफोड केली आहे.

याप्रकरणी अविनाश अरुण कदम (वय २६, रा. अप्पर २७६ ओटा, बिबवेवाडी) यांना फिर्याद दिली आहे. त्यानुसार सन्या उर्फ अभिषेक शिंदे, पिल्या उर्फ तेजस आंबुरे, सुरेश अडसुळ, अक्षय भालके, विशाल गोडदाप, धनंजय यांच्या विरोधात साथ रोग कायदा, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बिबवेवाडी परिसर प्रतिबंधात्मक म्हणून घोषित केला आहे. त्यामुळे परिसरत नागरिकांना घराबाहेर पडण्यास बंदी आहे. तरीही आरोपींनी बेकायदा जमाव करून कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असताना देखील गर्दी केली. तसेच, रस्त्याच्याकडे लावलेल्या कारची दोन्ही बाजूच्या काचा फोडल्या. तसेच, इतर एक कार व दोन रिक्षाच्या देखील काचा फोडून दहशत निर्माण केली. अचानक झालेल्या याप्रकारामुळे परिसरात चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता. टोळके दशहत माजविल्यानंतर पळून गेले. यात १४ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले आहे. अधिक तपास बिबवेवाडी पोलिस करत आहेत.