दारुड्याचा धिंगाणा ! महिलेवर वार तर तरुणाच्या डोक्यात दगड घातला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील कर्वेनगर परिसरात दारुड्याने तुफान धिंगाणा घालत महिलेच्या डोक्यात कोयता घातला. तर पुढे काही अंतरावर जाताच किरकोळ कारणावरून झालेल्या वादात तरुणाच्या डोक्यात दगड घातला.

कोंढाबाई गोवर्धन लोंढे (वय ६०, रा. हॅप्पी कॉलनी, कर्वेनगर), गणेश आनंदा कांबळे (वय ३२) आणि सुर्यकांत आनंदा कांबळे (वय ३६, दोघेही- रा. हिंगणे होम कॉलनी, कर्वेनगर) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात छोट्या पवार नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संभानगर येथे फिर्यादी यांची मुलगी घरासमोर उभी होती. त्यावेळी आरोपी हा त्या ठिकाणी दारू पिऊन पडला होता. त्यामुळे त्यांच्या जावयाने आरोपीला तू खूप दारू पिला आहेस, तू घरी जा असे सांगितले. घरी जाण्यास सांगितल्यामुळे आरोपीने त्यांच्याशी वाद घालून त्यांच्या कानाखाली मारून निघून गेला. त्यानंतर घराहून कोयता घेऊन आला. त्यांच्याशी वाद घालू लागला. त्यामुळे फिर्यादी मध्ये आल्यामुळे त्यांच्या डोक्यात कोयता घालून जखमी केले. त्या ठिकाणी भांडणे करून आरोपी छोट्या हा कांबळे वस्ती येथे गेला. जाताना त्याने सचिन कांबळे यांच्यासोबत वाद सुरू केले. त्यामुळे त्यांचे भाऊ गणेश कांबळे व सुर्यकांत कांबळे हे मध्ये भांडण सोडविण्यासाठी आले. त्यावेळी आरोपीने त्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर त्यांच्या डोक्यात दगड घालून जखमी केले. अधिक तपास वारजे माळवाडी पोलीस करत आहेत.