कोयत्याच्या धाकानं तिघा चोरटयांनी दुचाकीस्वारास लुटलं

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – कोयत्याचा धाकाने दुचाकीस्वार तिघा चोरट्यांनी मोटार चालकाला लुटले. त्यांच्याकडून ८ हजारांची रोकड आणि मोबाईल असा २८ हजारांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना बुधवारी पहाटे सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास औंधमधील परिहार चौकात घडली.

याप्रकरणी विनोद यमगर (वय ३३, रा. ओमकार कॉलनी, थेरगाव) यांनी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकीवरील तीन अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद यांची स्वतःची मोटार असून भाडेतत्त्वार प्रवाशांची ने-आण करतात. काल पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ते परिहार चौकातील यश टायर्ससमोरील रस्त्यावरुन एका प्रवाशाला घेउन चालले होते. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवर आलेल्या तिघा चोरट्यांनी विनोदच्या मोटारीला दुचाकी आडवी लावली. त्यांना कोयत्याचा धाक दाखवून खिशातील ८ हजारांची रोकड आणि मोबाईल मिळून २८ हजारांचा ऐवज चोरुन नेला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मोहन जाधव अधिक तपास करीत आहेत.

बँकेतून बोलत असल्याचे सांगत गंडा
बँकेतील बोलत असल्याचा बहाणाकरून सायबर चोरट्याने तरुणाला एटीएमची मुदत संपल्याचे सांगत ३८ हजारांचा ऑनलाईन गंडा घातला. याप्रकरणी संजीव कारकुड (वय ४९, रा. सुस रस्ता, पाषाण ) यांनी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आयटी ऍक्ट आणि फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.