पासोड्या विठोबा मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी फोडली, रक्कम लंपास

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – शहराच्या मध्यभागातील प्रसिद्ध अश्या पासोड्या विठोबा मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी फोडल्याची धक्कादायक घटना सकाळी उघडकीस आली आहे. चोरट्यांनी दानपेटी फोडून त्यातील रक्कम चोरली आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान शहरात घरफोड्यांचे सत्र सुरूच असून, दररोज बंद फ्लॅट फोडले जात आहेत.

याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

बुधवार पेठेत पासोड्या विठोबा मंदिर आहे. मंदिर रात्री बंद असताना अज्ञात चोरट्यांनी मंदिरात दरवाजाच्या जाळ्या तोडून आत प्रवेश केला. तसेच तेथील दानपेट्या फोडून त्यातील रक्कम चोरून नेली. सकाळी मंदिरात पूजा करण्यासाठी येथील गुरुजी आल्यानंतर हा प्रकार समोर आला. काही वेळातच ही माहिती पूर्ण परिसरात पसरली. यावेळी अनेकांनी येथे धाव घेतली होती. फरासखाना पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. रक्कम किती गेली हे समजलेले नाही. पोलिसांनी परिसरात असणारे सीसीटीव्ही तपासण्यास सुरुवात केली असून, त्यानुसार चोरट्यांचा माग काढण्यात येत आहे.

शहरात लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर घरफोड्या करणाऱ्या टोळीने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. चतुःश्रुंगीत एकाच वेळी 9 दुकाने फोडली तर हडपसर आणि मुंढवा भागात देखील 9 फ्लॅट फोडण्यात आले आहेत. त्यासोबतच दररोज 2 ते 3 फ्लॅट फोडण्यात येत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे या घटना रोखण्यास पोलीस अपयशी ठरत असल्याचे देखील दिसत आहे.