पुण्यात दरोडयाच्या तयारीत असलेल्या टोळीला अटक

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – सिंहगड भागातील नर्हे-धायरी परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीला सिंहगड पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून दोन दुचाकी, एक कार, मिरची पावडर, शस्त्रे, मोबाईल असा ५ लाख ८५ हजारांचा ऐवज जप्त केला आहे.

रोहित प्रकाश पोकळे (वय २८, रा. गणेश पेठ), अमित धनंजय बोराटे (वय २५, रा. गुरुवार पेठ), भूषण रमेश मोहिते (वय ३७, रा. धायरी), संदीप संजय दुबे (वय २५, रा. शुक्रवार पेठ), शुभम राजेश पवार (वय २५, रा. गणेश पेठ), सागर बाळासाहेब टिळेकर (वय २३, रा. गंजपेठ), अभिषेक संतोष पन्हाळे (वय २१, रा. गंजपेठ ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस नाईक सचिन तनपुरे यांनी फिर्याद दिली आहे.

रविवारी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास सिंहगड पोलिस हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी नर्हे-धायरी रस्त्यावर दोन दुचाकीवरील चौघेजण आणि मोटारीत बसलेले काहीजण पोलिसांना दिसून आले. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्याकडे जाउन चौकशी केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांच्याकडील मोटारीची झडती घेतली असता, त्यामध्ये मिरचीपूड, घातक शस्त्रे, दोरी आढळून आले. त्यानुसार पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी एका टेम्पोचालकाला अडवून मारहाण केल्याची कबुली दिली. तसेेेच दरोडा घालणार असल्याचे त्यांनी सांगितले. टोळीला वेळीच अटक केल्यामुळे दरोडा टळला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक नितीन जाधव करीत आहेत.