पुण्यात ज्येष्ठ महिलेकडील सोन्याचे दागिने लांबवले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  नवीन सोन्याचे दुकान सुरु केले असून, तुमच्या हातातील सोन्याच्या बांगडीचा माझ्या पैशाला स्पर्श झाला तर माझे दुकान चांगले चालेले अशी बतावणी करत चोरट्याने जेष्ठ महिलेच्या हातातील ६० हजार रुपये किंमतीची सोन्याची बांगडी चोरुन नेल्याची घटना घडली आहे. कात्रज-कोंढवा रस्त्यावरील सुदंरबन सोसायटीजवळ ही घटना घडली.

सुमन डिंबळे (वय ६०, रा. औदुत कॉम्प्लेक्स, त्रिमुर्ती चौकाजवळ, भारती विद्यापीठ) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमन यांचे कात्रज कोंढवा रोडवर सुंदरबन सोसायटीशेजारी किराणा दुकान आहे. दोन दिवसांपुर्वी सकाळी अकराच्या सुमारास त्या दुकानात एकट्याच बसल्या होत्या. त्यावेळी तेथे आलेल्या चोरट्याने सुमन यांना मी नवीन सोन्याचे दुकान सुुरु केले आहे. तुमच्या हातातील सोन्याच्या बांगडीचा माझ्या पैशांना स्पर्श झाला तर माझे दुकान चांगले चालेल, असे सांगितले. त्यानंतर चोरट्याने त्यांना ६० हजार रुपयांची हातातील सोन्याची बांगडी काढायला लावली. ती बांगडी घेऊन चोरट्याने खिशातून शंभर रुपयांची नोट काढली. त्या नोटेत बांगडी ठेवून रबरने गुंडाळून प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवण्याचा बहाणा केला. चोरट्याने सुमन त्यांची नजर चुकवून बांगडी काढून पळ काढला. अधिक तपास उपनिरीक्षक विशाल म्हेत्रे करीत आहेत.