पुणे : ज्वेलर्सच्या दुकानातून खरेदीच्या बहाण्याने सोन्याचे गंठण चोरले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने ज्वेलर्स दुकानात आलेल्या दोन महिलांनी १ लाख १० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे गंठण चोरुन नेल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास बिबवेवाडीतील नाकोडा ज्वेलर्समध्ये हा प्रकार घडला आहे.
याप्रकरणी दिलीप जैन (वय ४१, रा. कोंढवा बुद्रूक) यांनी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अज्ञात महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबवेवाडीतील सिद्धीविनायक टॉवरमध्ये जैन यांचे नाकोडा ज्वेलर्स आहे. काल दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास खरेदीच्या बहाण्याने दोन महिला ज्वेलर्समध्ये आल्या होत्या. त्यांनी जैन यांच्याकडून सोन्याचे गंठण पाहण्यासाठी हातात घेतले. त्यानंतर महिला चोरट्यांनी हातचलाखीने १ लाख १० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे गंठण चोरुन नेले. याप्रकरणी सीसीटीव्हीचे फुटेज तपासून चोरट्या महिलांचा शोध घेतला जात असल्याची सांगण्यात आले. अधिक तपास सहायक निरीक्षक किरण पावसे करत आहेत.