मद्याचे दुकान फोडून पावणेतीन लाखांचा ऐवज पळवला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  शहरातील घरफोड्याचे सत्र सुरूच असून, आता चोरटे बंद घरांसोबतच दुकाने देखील चोरटे फोडू लागली आहेत. चंदननगर भागात चोरट्यांनी मद्यविक्रीचे दुकान फोडून रोकड आणि दारूच्या बाटल्या चोरून नेल्या आहेत.

समीर जैस्वाल (वय ३० रा.ताथवडे) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जैस्वाल यांचे खराडी भागातील जुना मुंढवा रस्त्यावर मद्याविक्रीचे दुकान आहे. चोरट्यांनी मध्यरात्री दुकानाचा दरवाजा उचकटून दुकानात प्रवेश केला. तसेच दरवाज्याची काच फोडली. चोरट्यांनी गल्ला उचकटून गल्ल्यातील रोकड आणि मद्याच्या बाटल्या असा २ लाख ७० हजार २९० रुपयांचा मुद्देमाल लांबविला. सकाळी हा प्रकार समोर आला. त्यानंतर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. दरम्यान परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची पडताळणीकरून या चोरट्यांचा माग काढण्यात येत आहे. अधिक तपास उपनिरीक्षक प्रसाद कुलकर्णी हे करत आहेत.