पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सोसायटीत मास्क न परिधान करता आल्यानंतर त्या तरुणांना हटकल्यावरून झालेल्या भांडणात चौघांनी एकाला बांबू व लाथा बुक्क्यांनीे बेदम मारहाण केल्याची घटना घडली. पोलिसांनी तीघांना अटक केली आहे.
कृष्णा बबन लोखंडे (वय 22), अजय भागवत घाडगे (वय 21, दोघे रा. शनीनगर आंबेगाव खुर्द) आणि अनिल संभाजी नेटके (वय 21, रा. लिपाणे वस्ती, आंबेगाव खुर्द) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अमीत पाटील (वय 39, रा. आंबेगाव खुर्द) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राहत असलेल्या आंबेगाव खुर्द येथील साईसमर्थनगरी सोसायटीच्या पार्किंगमध्ये आरोपी मास्क न घालता उभे होते. त्यामुळे फिर्यादी पाटील यांनी त्यांना हटकले. तुम्ही मास्क का घातला नाही? अशी त्यांना विचारणा केली. त्यावरून चौघा आरोपींनी फिर्यादीसोबत वाद घातला व त्यांना मारहाण केली. आरोपींची फिर्यादीना लाथा बुक्क्यांनी तसेच बांबूने मारहाण केली. त्यात फिर्यादीच्या डोळ्याला, चेहऱ्यास तसेच उजव्या हातास मार लागल्याने ते जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिसानी तीन आरोपींना अटक केली आहे. अधिक तपास सहायक निरीक्षक ए. आर. कवठेकर करीत आहेत.