Pune – सिंहगड रोड : महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – घरफोड्यासोबतच सोन साखळी चोरणारे चोरटे सक्रिय झाले असून, सिंहगड रोड परिसरात एका दुचाकी चालक महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले आहे. याप्रकरणी 34 वर्षीय महिलेने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकीवरील एका व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या धायरी फाटा येथे राहतात. त्या कामानिमित्त सोमवारी सायंकाळी नातेवाईकाला घेऊन वडगाव बुद्रुक येथे गेल्या होत्या. वडगाव बुद्रुक येथील महात्मा बनेश्वर चौक येथे आल्यानंतर पाठीमागुन दुचाकीवरून आलेल्या एका व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील ३८ हजार रूपयांचे मंगळसुत्र हिसका मारून नेले. फिर्यादी यांनी आरडा-ओरडा केला. पण, तोपर्यंत चोरटा पसार झाला होता. अधिक तपास सिंहगड रोड पोलिस करत आहेत.