Pune : कबुतर पिंजर्‍यात ठेवल्याने तिघांकडून 16 वर्षीय मुलाला बेदम मारहाण, कोयत्याने सपासप वार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   उडून आलेले कबुतर पिंजऱ्यात ठेवल्यावरून एका 16 वर्षाच्या शाळकरी मुलावर तिघांनी बेदम कोयत्याने सपासप वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्याच्या हातावर, पायावर, पोटावर, डोक्यात वार केले असून, मुलगा गंभीर जखमी झाला आहे. मात्र अद्याप आरोपी पोलिसांना सापडलेले नाहीत.

Advt.

रोहित भालशंकर (वय 16) असे जखमी झालेल्या शाळकरी मुलाचे नाव आहे. याप्रकरणी सिहगड रोड पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित हा येथील एका शाळेत शिक्षण घेतो. तो राहण्यास वडगाव बुद्रुक येथील जाधवनगर परिसरात आहे. दरम्यान एक महिन्यांपूर्वी यातील एका आरोपीने पाळलेल्या कबुतरापैकी उडून एक कबुतर रोहित याच्या टेरेसवर आले होते. त्याने ते कबूतराला पकडून पिंजऱ्यात ठेवले. यावरून त्यांच्यात वाद झाले होते. यानंतर तिघांनी संगनमत करून बुधवारी दुपारी रोहित याला येथील रायगडनगर भागात गाठून बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याच्यावर कोयत्याने वार केले. त्याच्या दोन्ही हातावर, डोक्यात उजव्या पायावर सपासप वार केले आहेत. यात रोहित हा गंभीर जखमी झाला आहे. त्याने पोलिसांकडे तक्रार दिली आहे. दरम्यान अद्याप पोलिसांना आरोपींचा शोध लागलेला नाही. त्या आरोपींचा पूर्ण पत्ता फिर्यादीला माहीत नसल्याचे सांगण्यात आले. अधिक तपास उपनिरीक्षक काळे हे करत आहेत.