Pune : धुम्रपानास विरोध केल्याच्या रागातून तरूणावर तलवारीने वार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – रिक्षात सिगारेट ओढण्यास विरोध केल्याच्या रागातून तिघांनी एका तरुणावर तलवारीने वार केल्याची घटना धानोरीत घडली. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. विकास उर्फ लखन आल्हाट (वय २४) व आकाश खोडे (वय २२, रा. गोकुळनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सचिन काटे (वय २५, रा. धानोरी) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन व आरोपी एकाच परिसरात राहायला आहेत. त्यांची तोंडओळख देखील आहे. दोन दिवसांपुर्वी आकाश सचिनच्या रिक्षामध्ये बसून सिगारेट ओढत होता. त्यामुळे सचिनने त्याला पुन्हा रिक्षात सिगारेट पिण्यास बसायचे नाही, असे सांगितले. त्याचा राग आकाशाला आला होता. त्याने दोन साथीदाराच्या मदतीने सचिनला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली व तलवारीने वार केले. अधिक तपास सहायक निरीक्षक निकम करीत आहेत.