Pune : ‘भाई’ बर्थडेला तलवारीनं कापला केक, पोलिसांनी दोघांना पकडलं

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर जमावबंदी असताना भाईने त्याच्या वाढदिवसानिमित्त तलवारीने केक कापला; पण पोलिसांना हा प्रकार माहिती होताच त्यांनी दोघांना अटक केली. कोंढवा परिसरात ही घटना एनआयबीएम रस्त्यावर घडली आहे.

अक्षय अमरुषी शेलार (वय २२) व कुणाल प्रताप लोणकर (वय १९, दोघेही रा. कोंढवा-खुर्द) असे अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलीस नाईक विनायकराव टपके यांनी सरकारतर्फे कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाढदिवसानिमित्त दोन दिवसांपुर्वी अक्षयने बेकायदेशिरित्या जमाव जमविला. त्यावेळी त्याचा साथीदार कुणालसह तिघेजण हजर होते. कोरोनामुळे जमावबंदी असतानाही त्यांनी परिसरात दहशत निर्माण होण्याच्या हेतूने तलवारीने केक कापल्याचे दिसून आले. त्यामुळे अक्षय आणि कुणालला अटक करण्यात आली. त्यांच्या तीन साथीदारांचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. अधिक तपास उपनिरीक्षक संतोष शिंदे करीत आहेत.