मध्यवस्तीत घरात घुसून जेष्ठ महिलेचे दागिने चोरले

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – शहराच्या मध्यवस्तीत असणाऱ्या नारायण पेठेत पाणी मागण्याच्या बहाण्याने घरात शिरून ज्येष्ठ महिलेला मारहाण करून त्यांच्या हातातील सोन्याच्या बांगड्या, अंगठी हिसकावून नेल्याची घटना समोर आली आहे. शनिवारी दुपारी ही घटना घडली आहे.  याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात 80 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार, ४५ ते ५० वयोगटातील अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या घरी एकट्याच राहतात. त्या शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास बाहेरून आल्यानंतर त्यांनी घराचा दरवाजा उघडला. त्यावेळी एक अनोळखी व्यक्ती पाणी मागण्याच्या बहाण्याने त्यांच्या घरात शिरला. कोणी नसल्याचे पाहून त्याने ज्येष्ठ महिलेच्या हातामधील सोन्याच्या चार बांगड्या काढून घेऊ लागला. त्यावेळी महिलेने प्रतिकार केला असता त्याने महिलेच्या हातातील काचेच्या बांगड्या फोडल्या. त्यामध्ये महिलेच्या हाताला जखम झाली. महिला बांगड्या  व सोने काढून देत नसल्याचे पाहून त्याने महिलेच्या छातीवर गुडघा ठेऊन अंगावरील सोन्याच्या बांगड्या, इतर दागिने जबरदस्तीने काढून घेतले.

यामध्ये ज्येष्ठ महिला जखमी झाली आहे. सोने काढून घेतल्यानंतर चोरटा पसार झाला. त्यानंतर महिलेने आरडा-ओरडा केला. नागरिकांनी पोलिसांना कळविल्यानंतर विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस तपास करत आहेत.