Pune : स्वॅब फेकून दिल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – वडगाव बुद्रूक येथील कोविड तपासणी केंद्रात वाद घालत स्वॅब फेकून दिल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमची तपासणी अगोदर करा, नाहीतर कोणाचीही तपासणी होउ देणार नाही, असे म्हणत स्वॅब फेकल्याचा प्रकार सोमवारी दुपारी घडला होता.
याप्रकरणी शिवानी श्रीकांत उगले व प्रीतम संजय बोंद्रे (रा. आंबेगाव बुद्रूक ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी नितीन राजगुरु (वय ४५, रा. इंदिरानगर ) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर वडगाव बुद्रूक परिसरात नागरिकांसाठी मोफत कोविड तपासणी केंद्र उभारण्यात आले आहे. त्याठिकाणी रांगेत नागरिकांची तपासणी करण्यात येत होती. त्यावेळी तेथे आलेल्या शिवानी व प्रीतमने डॉक्टरांना आमची कोविड तपासणी अगोदर करा, अन्यथा कोणाचीही तपासणी करु देणार नसल्याचे म्हटले.

त्यामुळे डॉक्टरांनी दोघांनाही रांगेतून येण्याचा सल्ला दिला. त्याचा राग आल्याने दोघांनी कोविड केंद्रातील रुग्णाचे स्वॅब फेकून देत चांगलाच गोंधळ घातला होता. यामुळे शहरात मोठी खळबळ माजली होती. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.