Pune : चतुःश्रृंगी परिसरात महिलेच्या हातातील मोबाईल हिसकावला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   शहरात सोन साखळी हिसकवणाऱ्या तसेच लूटमार करणाऱ्या चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला असून, चतुशृंगी परिसरात रात्री दुचाकीस्वार महिलेच्या हातातील दोन मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी 34 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकीवरील दोन अनोळखी व्यक्तिविरोधात चतुशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या शिवाजीनगर परिसरात राहण्यास आहेत. कामानिमित्त त्या बाहेर परिसरात गेल्या होत्या. दोन दिवसांपूर्वी त्या व त्यांची मैत्रीण मोपेड दुचाकीवरुन बाणेर रोडने येत होत्या. यावेळी सिंध सोसायटी समोर आल्या असता पाठीमागून दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी त्यांच्याजवलील 24 हजार रुपयांचे दोन मोबाईल जबरदस्तीने हिसकावून चोरून नेले. त्यांनी आरडा-ओरडा केला. पण चोरटे पसार झाले. पोलिसांना माहिती होताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील सीसीटीव्हीची पाहून चोरट्यांचा माग काढला जात आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजयकुमार लांबतुरे हे करत आहेत.