Pune : एक वर्षाच्या चिमुरड्याचे 2 महिलांनीकेलं अपहरण, आज पहाटे तो पुन्हा आईच्या कुशीत विसावला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील गाडीतळ पुलाखालून दोन दिवसांपूर्वी आईजवळ झोपलेल्या एक वर्षाच्या चिमुरड्याचे दोन महिलांनी अपहरण केल्यानंतर आज पहाटे तो चिमुरडा पुन्हा आईच्या कुशीत परत आला. विशेष म्हणजे, त्याला पहाटेच कोणी तरी तिथे आणून सोडले, असे सांगण्यात येत आहे. पण, यामुळे या परिसरात “ही पोलिसांची दहशत,” की त्या “अपहरणकर्त्यांना त्याची दया आली,” अशी चर्चा सुरू झाली आहे.

या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात 22 वर्षीय महिलेने फिर्याद दिली होती. त्यानुसार दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पतीसोबत वाद झाल्यामुळे फिर्यादी शर्मिला नीलेश काळे या हडपसर येथील गाडीतळ पुलाखाली काही ओळखीच्या महिलांसोबत राहत होती. ती रविवारी रात्री येथे आली होती. मात्र, सोमवारी पहाटेच्या सुमारास त्या गाढ झोपेत असताना दोन महिला पायी चालत त्या ठिकाणी आल्या. त्यांनी फिर्यादी यांच्याजवळ झोपलेल्या त्यांच्या एक वर्षाच्या मुलाला उचलून घेऊन गेल्या.

काही वेळानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर फिर्यादीनी संपूर्ण गाडीतळ परिसर पिंजून काढला; परंतु बाळ सापडले नाही. त्यानंतर त्यांनी हडपसर पोलीस स्टेशन गाठत बाळ हरवल्याची तक्रार दिली. हडपसर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत या मुलाचा शोध सुरू केला होता. अपहरणाचा हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैदही झाला होता. पोलीस शोध घेत असताना आज पहाटे अज्ञातांनी त्या चिमुकल्याला पुन्हा या ठिकाणी आणून सोडले आहे. दरम्यान, या चिमुकल्या मुलाला अपहरणकर्त्यांनीच या परिसरात पुन्हा आणून सोडले असावे. हडपसर पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पण, तो चिमुकला पुन्हा एकदा आईच्या कुशीत विसावल्यानंतर आईच्या डोळ्यांत आनंदाचे अश्रू वाहू लागले.