Pune : पाषाणमध्ये दुकान फोडले तर भेकराईनगरमध्ये बंद फ्लॅट फोडून चोरी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात घरफोड्यांचे सत्र काही केल्या कमी होत नसून, पाषाण येथे एक जनरल स्टोअर्सचे दुकान फोडून ४२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे, तर भेकराईनगर येथे बंद फ्लॅट फोडून ३२ हजार रुपयांचा ऐवज चोरला आहे.

या प्रकरणी चतुःश्रृंगी व हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाषाण परिसरात राहणारे इमामुद्दी निजामुद्दीन शेख (वय ३७) यांचे के. के. जनरल स्टोअर्स अँड होलसेलर दुकान आहे. नेहमीप्रमाणे सोमवारी रात्री त्यांनी रात्री नऊच्या सुमारास दुकान बंद करून गेले होते. त्यानंतर दुकानाचे चोरट्यांनी शटर उचकटून किराणा मालाचे साहित्य व रोख रक्कम असा ४२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. सकाळी आले असता, त्यांना घरफोडीचा प्रकार समोर आला आहे, तर दुसऱ्या घटनेत चोरट्यांनी भेकराईनगर बंद धराचे कुलूप तोडून ३२ हजारांचा ऐवज चोरून नेला.

या प्रकरणी स्नेहल सुनील जाधव (वय २५) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मंगळवारी सकाळी स्नेहल घर बंद करून बाहेर गेल्या होत्या. त्यावेळी चोरट्याने कुलूप तोडून त्यांच्या घरातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम व इतर वस्तू असा ३२ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. अधिक तपास हडपसर पोलीस करत आहेत.

You might also like