Pune News : ‘त्या’ चौकातून दुचाकीस्वार चोरटा पसार..!

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   भारती विद्यापीठ वाहतूक विभागाचे पोलीस वाहन चालकांवर कारवाई करण्यासाठी 5 ते 6 जण घोळका करत राजस सोसायटी या महत्वाच्या चौकाच्या काही अंतर पुढे उभा राहून दणकेबाज कारवाई करत असताना त्याच चौकातून एक चोरटा माहिलेची पर्स हिसकावून पळाला. विशेष म्हणजे त्याच्या दुचाकीला नंबर प्लेट नव्हती. त्यामुळे आता जर पोलीस चौकातच उभा राहीले असते तर तो पकडला गेला असता अशी जोरदार चर्चा सुरू आहे.

नेमकं घडले असे, कात्रज परिसरात राहणारी 49 वर्षीय महिला काल (बुधवारी) राजस सोसायटीच्या हुजुरपागा शाळेसमोर असलेल्या बस थांब्याजवळून जात होत्या. थांबली होती. त्यांच्या हातात एक पिशवी होती. यावेळी अचानक भरधाव दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने ती पिशवी हिसकावून नेली. महिलेने आरडाओरडा केला. पण, नेहमी सारखे चोरटा पसार झाला. त्यानंतर याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सकाळी साडे दहाच्या सुमारास कात्रज परिसरातील राजस सोसायटी येथील बस थांब्यासमोरून पायी जात होत्या. त्यावेळी नंबर प्लेट नसलेल्या काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्याने फिर्यादी यांच्या हातातील गुलाबी रंगाची पिशवी हिसकावून नेली. त्यांमध्ये एक मोबाईल आणि रोख रक्‍कम असा १८ हजार ९९० रुपयांचा मुद्देमाल होता. राजस सोसायटी चौकात ‘पीजीझेड’ (फिरता) कॅमेरा आहे. पण, फिरता कॅमेरा असल्याने दुचाकीस्वार त्यात आढळून आला नाही. अधिक तपास सहायक निरीक्षक वैभव पवार करत आहेत.

घोळक्याने कारवाई…

राजस सोसायटी चौकात कोंढव्याकडून येणाऱ्या वाहनांवर वाहतूक नियमभंगाच्या कारवाईसह ‘मास्क’ची कारवाई करतात. 5 ते 6 कर्मचारी असतात. हे कर्मचारी चौकात होणाऱ्या वाहतूक नियमभंगाकडे पूर्णत: काणाडोळा करून, केवळ कारवाईकडेच लक्ष असते. त्यामुळे कारवाई सुरू असताना मात्र सर्रासपणे नियमांचा भंग होतो.