तुळशीबाग, बेलबाग चौक परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात भुरट्या चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे, पण विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तुळशीबाग अन बेलबाग चौक परिसर शनिवार चोरट्यांचा खास दिवस ठरला आहे. काही वेळातच खरेदीसाठी आलेल्या पुणेकरांच्या किंमती ऐवजावर डल्ला मारला. तर, हडपसरलाही चोरट्यांनी एक गुन्हाकरून त्यांची चोक कामगिरी पार पाडली आहे.

याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात स्वतंत्र तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शनिवारी दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास लातुर जिल्ह्यातील 24 वर्षीय महिला बेलबाग चौकात खरेदी करण्यासाठी आली होती. यावेळी त्या मुळचंद दुकानासमोर आल्यानंतर सॅकमध्ये ठेवलेल्या पर्समधील 7 हजाराची रोकड त्यांच्या न कळत काढली. तसेच, त्यांचे कागदपत्रेही चोरून नेली. काही वेळाने त्यांना हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर त्यांनी पोलीसांकडे तक्रार दिली.

तर दुसर्‍या घटनेत आकुर्डी येथील 21 वर्षीय महिलेजवळील ऐवज चोरून नेला आहे. महिला साडे चार वाजण्याच्या सुमारास मध्यवस्थीत खरेदीसाठी आल्या होत्या. त्यावेळी गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी त्यांच्या पर्समधील रोकड आणि मोबाईल असा 5 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.

तसेच, तुळशीबाग ते कुंठे चौकादरम्यान तिसरी घटना घडली असून, यात चोरट्यांनी 700 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी वारजे माळवाडी परिसरात राहणार्‍या 25 वर्षीय महिलेने पोलीसांकडे तक्रार दिली आहे. त्यांनी पर्समध्ये पैसे ठेवले होते. चोरट्यांनी पर्समधून ते पैसे काढून घेऊन पोबारा केला आहे.

शनिवारी आणि रविवारी मध्यवस्थीत मोठ्या प्रमाणात गर्दी असते. महिला तसेच तरुणी तुळशीबागेत व बेलबाग चौकात खरेदीसाठी येतात. त्याचाच फायदा या चोरट्यांनी घेण्यास सुरूवात केली आहे. एखादी घटना घडत होती. पण, शनिवार तर, चोरट्यांनी गाजवलाच आणि काही तासांत तीन चोरीच्या घटना घडल्या. पण, पोलिसांना त्याचा काही फरक पडेल असे वाटत नाही. रविवारी गर्दी होणार हे माहित असताना आज तेथे काहीच बंदोबस्त नसल्याचे दिसून आले.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/