ससून रुग्णालयात उपचारासाठी गेला असताना वॉर्डातही केली पुन्हा मारहाण, दोघांवर गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | पुण्यात मी एकटाच सॉईल टेस्टिंग (माती परिक्षण) करणार, तुम्ही माझ्या व्यवसायात आड आला तर तुम्हाला संपवायला वेळ लागणार नाही, अशी धमकी देऊन तरुणाच्या भावाला मारहाण केली. त्याची तक्रार न दिल्याने वर्ग मित्राने या तरुणाला बेदम मारहाण केली. तो उपचार घेण्यासाठी ससून रुग्णालयात गेला असता तेथेही पुन्हा मारहाण करण्याचा प्रकार घडला.
याबाबत सौरभ अशोक गौतम (वय २५, रा. मंगळवार पेठ) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी समीर सलीम शेख (वय २४, रा. काकडे वस्ती, कोंढवा) आणि त्याचा भाऊ सोहेल सलीम शेख यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार नाना पेठेतील मामाज स्टुडिओ फर्निशिंग स्टोअरच्या समोर २८ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता व ससून रुग्णालयात घडला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभ गौतम हे मामाज फर्निशिंग स्टोअरमध्ये सेल्समन म्हणून नोकरी करतात. आरोपी सलीम शेख हा २०१८ मध्ये अकरावीत शिकत असताना राजा धनराज गिरजी हायस्कुलमध्ये वर्ग मित्र होता. समीर शेख याने सॉईल टेस्टिंगचे काम करत आहे. सौरभ यांचा भाऊ संदिप गौतम हा सुद्धा सॉईल टेस्टिंगचे काम करायचा. तेव्हा समीर याने संदिप यांना धमकी दिली की, पुण्यामध्ये फक्त मी काम करणार, तु काम करु नकोस, असे म्हणाला. त्यावरुन संदिप व समीर यांच्यामध्ये भांडणे झाली. त्यावेळी समीर याने संदिप यांना मारहाण केली होती. परंतु, त्यांना विषय वाढवायचा नसल्याने त्यांनी तक्रार दिली नाही. त्यानंतर १३ एप्रिल रोजी समीर याने दोन्ही भावांना धमकी दिली. त्याची त्यांनी समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला. त्यानंतर चार दिवसांनी समीर याने सौरभ यांना फोन करुन तू मला भेटुन सॉरी बोल व माझ्या पाया पड़ मला तुझ्या घरामध्ये घुसायला जास्त वेळ लागणार नाही, असे म्हणून धमकावले.
२८एप्रिल रोजी सौरभ हे मामाज स्टुडिओ फर्निशिंग स्टोअरमध्ये काम करीत असताना समीर सायंकाळी ६ वाजता आला. त्याने शिवीगाळ करीत सौरभला दुकानाबाहेर बोलविले. तो आरडाओरडा करु लागल्याने सौरभ बाहेर आले. तेव्हा समीर शेख म्हणाला की, तुम्ही माझ्यासोबत गेम करताय का, सॉईल टेस्टिंगचे काम करता व मला बोलता की काम करीत नाही. तुझ्या भावाबरोबर काय गेम करतो हे तुम्हाला कळणार नाही, असे बोलून समीर याने सौरभ यांच्या गालावर, मानेवर,नाकाला, जबड्याला हाताने मारहाण करुन जखमी केले. ते महात्मा फुले पोलीस चौकीत गेले. पोलिसांनी उपचाराची यादी देऊन ससून रुग्णालयात पाठविले. ते ससून रुग्णालयात गेले असता वॉर्ड नंबर ४० मध्ये समीर व त्याचा भाऊ सोहेल शेख हे अगोदरच आले होते. त्यांनी तेथे पुन्हा मारहाण करुन जखमी केले. पोलीस उपनिरीक्षक माने तपास करीत आहेत.